दुर्गम भागातही ‘एसीबी’ची दहशत

By Admin | Updated: June 14, 2015 01:50 IST2015-06-14T01:50:54+5:302015-06-14T01:50:54+5:30

वाढत्या भ्रष्टाचारावर आळा घालण्यासाठी जिल्हावासी जागरूक होऊन पुढाकार घेत असल्याचे दिसून येत आहे.

ACB panic in remote areas too | दुर्गम भागातही ‘एसीबी’ची दहशत

दुर्गम भागातही ‘एसीबी’ची दहशत

लाचखोरीला लगाम : पाच महिन्यात १५ कारवाया, प्रथमच पोलीस अधिकारी अडकले
गोंदिया : वाढत्या भ्रष्टाचारावर आळा घालण्यासाठी जिल्हावासी जागरूक होऊन पुढाकार घेत असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत शहरी भागापुरत्या मर्यादित असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) कारवाया आता दरेकसा व केशोरीसारख्या दुर्गम भागांतही या वर्षात झाल्या आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्ह्यात गेल्या वर्षभरात १५ कारवाया केल्या असून यात पोलीस अधिकारी पहिल्यांदाच एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत, हे विशेष.
कोणतेही काम करून देण्याच्या मोबदल्यात चहापाणी किंवा मिठाईच्या नावावर लाच मागणे ही एक अघोषीत परंपराच बनली आहे. चपराश्यापासून ते वरिष्ठ अधिकारी सर्वच या परंपरेचे अनुकरण करीत आहेत. परिणामी सर्वसामान्य माणसाची कामे अडकून पडत आहेत व त्यांना कार्यालयाच्या हेलपाट्या माराव्या लागत आहेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांची लाचखाऊ वृत्ती एवढी वाढली आहे की, आपल्या सहकाऱ्यालाही ते सोडत नाहीत.
लाचखोरीच्या या सर्व प्रकारावर आळा बसावा यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यरत आहे. मात्र कोर्ट- कचेरीच्या पचड्यापासून दूर राहणेच बरे हा विचार करून सहजासहजी कुणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविण्यास पुढे येत नाही. मात्र तक्रारदाराची अडकलेली कामे करवून देऊन कोर्ट-कचेरीच्या कामांतही खांद्याला खांदा लावून उभे राहण्याची हमी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून दिली जात आहे. शिवाय लोकांत जागृतीचे काम विभागाकडून केले जात आहे.
यामुळेच जिल्हावासीयांच्या मनात असलेली भिती आता दूर होत असल्याचे दिसून येत आहे. हेच कारण आहे की, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवायांत वाढ होत असून ‘एसीबी’ जिल्ह्यातील दरेकसा व केशोरी सारख्या नक्षलग्रस्त व अतिदुर्गम भागांत पोहचली आहे. यातून या दुर्गम भागातही भ्रष्टाचार बोकाळला असल्याचे दिसून येत असून तेथील नागरिकांत लाचखोरीच्या या घटनांबाबत आता जागृती झाल्याचे या कारवायांतून दिसून येते. (प्रतिनिधी)

गतवर्षीच्या तुलनेत वाढल्या कारवाया
सन २०१४ हे वर्ष लाचलुचपत प्रतिबंधक विभागासाठी सुगीचे ठरले होते. कारण मागील वर्षी विभागाने २७ कारवाया केल्या होत्या. तर सन २०१६ सुद्धा चांगले दिसून येत असून या वर्षात आतापर्यंत विभागाने १७ कारवाया केल्या आहेत. यात जानेवारी महिन्यात- दोन, फेब्रुवारी- पाच, मार्च- दोन, एप्रिल- चार व मे महिन्यात दोन कारवाया करण्यात आल्या आहेत. सहा महिन्यांची ही आकडेवारी असून उर्वरीत सहा महिन्यांत मागील वर्षाचा रिकॉर्ड तुटणार यात शंका दिसून येत नाही.
जिल्हा परिषद व महसूल खाते आघाडीवर
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या सहा महिन्यांत १५ कारवाया केल्या आहेत. यात जिल्हा परिषद व महसूल विभागाच्या प्रत्येकी चार कारवाया असून हे दोन्ही विभाग या वर्षातील कारवायांत आघाडीवर दिसून येत आहेत. तर त्यानंतर पोलीस, वन व पंचायत समितीतील प्रत्येकी दोन व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातील एक कारवाई आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात एसीबीचे कार्यालय सुरू झाल्यापासून पोलीस अधिकाऱ्यांवर कधीच कारवाई झाली नव्हती. या वर्षी मात्र पोलीस विभागातील अधिकारीही सुटले नाही.
टोल फ्री १०६४ क्रमांकाला प्रतिसाद
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांच्या सोयीसाठी १०६४ टोल फ्री क्रमांकाची सुविधा सुरू केली आहे. या सोयीला नागरिकांकडून प्रतिसादही लाभत असल्याचे कळले. याशिवाय विभागाने ‘एसीबीमहाराष्ट्र.नेट’ हा मोबाईल अ‍ॅप तयार केला आहे. तसेच जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा ‘एसीबीगोंदिया अ‍ॅट जीमेल.कॉम’ या ईमेल एड्रेस असून यावरूनही तक्रार करता येत असून नागरिकांनी या सोयींचाही लाभ घेण्याचे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.

लाचखोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी नागरिकांनी निर्भिडपणे पुढे यावे. तक्रारदाराने घाबरण्याचे कारण नसून त्यांची प्रलंबीत कामे एसीबी करून देणार. तसेच विभागाकडून तक्रारदाराबद्दल पूर्ण गोपनियता बाळगली जात असून न्यायालयीन कारवाईतही विभाग त्यांच्या सोबत राहणार.
- दिनकर ठोसरे
उपअधीक्षक लाचलूचपत प्रतिबंधक विभाग

Web Title: ACB panic in remote areas too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.