पतीच्या विरहात ‘ती’ जपतेय उदरातील अंकुर
By Admin | Updated: December 16, 2014 22:46 IST2014-12-16T22:46:24+5:302014-12-16T22:46:24+5:30
सौभाग्याचं कुंकु म्हणजे पती परमेश्वर. पती असला की पत्नीचे जीवन सार्थकी लागते. दोघांच्या आयुष्यात अपत्य जन्माचा आनंद त्याहून अधिक असतो. पत्नी गर्भवती असताना तिला पतीच्या आधाराची गरज असते.

पतीच्या विरहात ‘ती’ जपतेय उदरातील अंकुर
नियतीची क्रूर थट्टा : तिच्या वाट्याला आले एकाकी जीवन
प्रशांत देसाई - भंडारा
सौभाग्याचं कुंकु म्हणजे पती परमेश्वर. पती असला की पत्नीचे जीवन सार्थकी लागते. दोघांच्या आयुष्यात अपत्य जन्माचा आनंद त्याहून अधिक असतो. पत्नी गर्भवती असताना तिला पतीच्या आधाराची गरज असते. मात्र नियतीच्या मनात काय होते कुणास ठाऊक? सिल्ली येथील एका दाम्पत्यावर काळाने झेप घेतली. पतीचा अपघाती मृत्यू झाला. एकीकडे पतीच्या विरहाचे दु:ख आणि दुसरीकडे ‘ती’ उदरात वाढत असलेल्या अंकुराला जीवापाड जपत आहे.
भंडारा येथून आठी किलोमीटर अंतरावर असलेल्या सिल्ली येथील गिऱ्हेपुंजे दाम्पत्यावर हा दुर्देवी प्रसंग ओढवला आहे. शेषराव ईस्तारी गिऱ्हेपुंजे हा गवंडी काम करून कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत होता. पत्नीसह तो गावातच एका जागेवर चंद्रमौळी झोपडीवजा घर बांधून वास्तव्य करीत होता. आधीच निराधार असलेला शेषराव भंडारा येथे गवंडी काम करीत होता. शेषराव व शालुच्या लग्नाला १२ वर्षे लोटले. मात्र अपत्य नव्हते. त्यामुळे ते काहीसे खिन्न व्हायचे. परंतु, संसार मात्र आनंदात सुरू होता.
१२ वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर त्यांच्या जीवनात अपत्याच्या आगमनाचे संकेत मिळाले. त्यांच्या संसाररूपी वेलीवर अंकुर फुलू लागले होते. त्यामुळे दोघांच्याही आनंदाला पारावार नव्हता. १२ वर्षानंतर त्यांच्या घरात बाळाचा आवाज गुंजणार होता. दिवसामागून दिवस पालटत होते. पत्नीच्या पोटात वाढत असलेल्या गर्भाचीही वाढ होत होती. जन्माला येणारा बाळ मम्मी - पप्पा अशी हाक मारेल, या हाकेच्या कल्पनेनेच त्या दाम्पत्यांचे कान आसुसले होते. अनेक वर्षांनंतरचा तो दिवस येणार होता. मात्र नियतीला हा आनंद त्या दाम्पत्याच्या आयुष्यात मान्य नव्हते. त्यांच्या आनंदावर टपून बसलेल्या काळाने घात केला आणि या आनंदी दाम्पत्यांच्या जीवनात काळोख पसरवून गेला.
२२ आॅक्टोबरला शेषराव हे भंडाऱ्याला येत असताना कारधा नाक्याजवळ बस अपघातात त्याचा मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूने शालुचा कायमचा आधारवड गेला. त्याचवेळी पोटात वाढत असलेल्या बाळाला जग बघता यावे, यासाठी एका डोळ्यात आनंद तर दुसऱ्या डोळ्यात दु:ख साठवून गर्भाची पुरेपूर काळजी घेत आहे.
काही दिवसातच ती बाळाला जन्म देणार आहे. मात्र बाळाचा चेहरा बघायला, त्याच्याशी खेळायला त्याचे वडील या जगात नाही, ही कल्पनाच हृदय हेलावणारी आहे. जन्माला येणाऱ्या बाळासोबत आणि गर्भवती मातेसोबत नियतिने केलेली क्रूर थट्टा मानवी मेंदूला झिनझिन्या आणणारी आहे.
मामाच ठरले शालूचे आईवडील
शालू ही लहान असतानाच तिच्या आईवडिलांचा मृत्यू झाला. परसोडी येथील तिचे मामा श्यामलाल येळणे यांनीच तिला लहानाचे मोठे केले. त्यांनीच आईवडिलाची जबाबदारी सांभाळत तिचे लग्न करुन दिले. शेषरावलाही आईवडील नसल्यामुळे तिला सासु-सासरे तिने पाहिले नाही. पतीसह गुण्यागोविंदाने चंद्रमौळी झोपडीत राहत असताना काळाने पतीलाही तिच्यापासून हिरावले. सध्या ती एकाकी जीवन जगत आहे. आधार आहे तो केवळ मामाचा.