आंबागड किल्ला विकासापासून कोसो दूर
By Admin | Updated: July 1, 2016 00:49 IST2016-07-01T00:49:50+5:302016-07-01T00:49:50+5:30
सातपुडा पर्वत रांगाच्या कुशीत वसलेल्या ऐतिहासिक आंबागड किल्ला उपेक्षीत असून विकासापासून कोसो दुर आहे.

आंबागड किल्ला विकासापासून कोसो दूर
पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष : किल्ल्याचे काम कासवगतीने
विलास बन्सोड उसर्रा
सातपुडा पर्वत रांगाच्या कुशीत वसलेल्या ऐतिहासिक आंबागड किल्ला उपेक्षीत असून विकासापासून कोसो दुर आहे.
इ.स. १७०० च्या सुमारास सदर किल्ला तयार करण्यात आला. गोंडराजा बख्तबुलंद यांच्या कारकीर्दीत त्यांचा शिवनी येथील राजखान नामक पठाण सुभेदाराने राजे बख्त बुलंद यांच्या आदेशाने सदर किल्ला उभारला. गोंडानंतर हा किल्ला भोसले यांच्याकडे आला. त्यावेळी या किल्ल्याचा उपयोग तुरुंगाप्रमाणे करण्यात येत होता. आणि या किल्ल्यात कैदी डांबल्यानंतर तेथील विहीरीचे घाणेरडे, साचलेले पाणी कैद्यास प्यावे लागे आणि त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडूनते मृत होत असत अशी या किल्ल्याविषयी आख्यायिका आहे.
किल्ले स्थापत्य प्रकारापैकी हा किल्ला गिरीदुर्ग या प्रकारातील आहे. या किल्ल्यास एकच मुख्य प्रवेशद्वार असून त्यास महादरवाजा म्हणून ओळखले जाते. दरवाजा त्रिकोणी कमानयुक्त असून नक्षी आणि पिंपळ पानाच्या नक्षीने अलंकृत आहे. कमालीच्या वरच्या दोन्ही बाजूस दोन कमळ कोरली आहेत. मुख्य दरवाज्यामध्ये सुरक्षेच्या दृष्टीकोनातून रक्षकांच्या खोल्या निर्मित केल्या आहेत. आंबागड किल्ला दोन स्वतंत्र भागात बांधल्या असून किल्ला व बालेकिल्ला असे त्याचे दोन भाग आहेत. बालेकिल्ल्यात राजघराण्याशी संबंधीत व्यक्तीचे निवास करण्याची जागा आणि मसलत खाना, दारुगोळा, धान्य कोठार इत्यादी वस्तु आहेत. तसेच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था केली आहे. बालेकिल्ला वगळून इतर परिसरात अधिकाऱ्यांची निवासस्थाने विहिरी आणि बांधीव तळी आहेत. याशिवाय हत्तीखाना म्हणून एक प्रसिध्दीस्थळ आहे. किल्ल्याच्या तटबंदीस एकुण नऊ बुरुज असून बालेकिल्ल्याच्या तटबंदीत दोन बुरुज आहेत. यापैकी किल्ल्याच्या तटभिंतीस चार टेहाळणी बुरुज असून बुरुजावर तोफ ठेवली जात असे. एकंदरीत आंबागड किल्ला हा विदर्भातील उत्तम गिरीदुर्ग असून उत्तर मध्ययुगीन काळातील स्थापत्यांचे उत्तम उदाहरण आहे. हा किल्ला सध्या उपेक्षीत आहे.
पर्यटकांच्या संख्येत वाढ
निसर्गरम्य आंबागड किल्ला व त्या सभोवताल असलेला आंबागड तलाव पर्यटकांचे आकर्षन केंद्र ठरला आहे. या तलावातून शेकडो एकर शेती सिंचनाखाली आहे. अशातच आंबागड किल्ला पर्यटकांच्या गळ्यातील जणू ताईतच बनला आहे. दिवसेंदिवस येथे पर्यटकांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरु असते. किल्ल्याचा उत्तर दिशेला शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करणाऱ्या महत्वाकांक्षी जीवनदायी बावनथडी अगदी हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे हा भाग जणू स्वर्गच आहे.
सध्या पावसाळा सुरु झाला असून हिरव्यागर्द शालूंनी पांघरलेल्या आंबागड किल्ल्यावर पर्यटकांची संख्या कमालीची वाढत आहे. पुरातत्व विभाग यांनी सदर किल्ल्याकडे जास्त निधी उपलब्ध करुन दिल्यास किल्ल्याचे कायापालट नक्की होईल यात काही शंका नाही.