आंबागडात हुंदके... आक्रोश.. अन् आक्रोश

By Admin | Updated: October 24, 2015 02:50 IST2015-10-24T02:50:40+5:302015-10-24T02:50:40+5:30

सकाळपासूनच विजयादशमी साजरे करण्याची चाहूल लागली होती. सकाळी गावात घट विसर्जन करण्यात आले.

Aamagadat hundke ... arouse .. and resentment | आंबागडात हुंदके... आक्रोश.. अन् आक्रोश

आंबागडात हुंदके... आक्रोश.. अन् आक्रोश

विजयादशमीवर काळाचा घाला : धीर देणारे झाले होते अधीर, तिन्ही मुलांवर सामूहिक अंत्यसंस्कार
मोहर भोयर तुमसर
सकाळपासूनच विजयादशमी साजरे करण्याची चाहूल लागली होती. सकाळी गावात घट विसर्जन करण्यात आले. दसऱ्याला लोखंडी साहित्याची पुजा केली जाते. त्यासाठी चार शाळकरी मुले घराजवळच्या तलावात सायकल धुण्यासाठी घरुन निघाले. परंतु अवघ्या तासाभरात तिघांच्या मृत्यूची वार्ता गावात पसरली आणि सर्वत्र आक्रोश अन् हुंदके दिसून आले. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली. रावण दहणाचा कार्यक्रम तर झाला नाहीच परंतु आंबागड या छोट्याशा गावात कुणाच्याही घरी रात्री चुली पेटल्या नाहीत.
तुमसर तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगात आंबागड हे तीन हजार लोकवस्तीचे गाव आहे. गुरुवारला सकाळी ८.३० वाजताच्या सुमारस सुनील वाढीवे (१८), राजकुमार टेकाम (१६), सानिया ठाकरे (१०) व सचिन टेकाम (१६) या शाळकरी मुलांनी सायकल धुण्याचा बेत आखला. त्यासाठी हे चौघेही गावाबाहेरील तलावावर सायकल धुण्याकरिता गेले. त्याच तलावात रवी रहांगडाले हेसुद्धा आपले ट्रॅक्टर धूत होते. आपआपल्या सायकल धुतल्यानंतर ते सायकलने जाण्यापेक्षा ट्रॅक्टरने जाऊ, असे त्या चौघांनीही ठरविले. ट्रॅक्टरचालक रवीने त्यांना घेऊन जाण्यासाठी होकारही दिला. सोबतच्या सायकलस ट्रॅक्टर ट्रॉलीत टाकून चौघेही जण ट्रॉलीत बसले. परतताना आंबागड तलावाच्या वितरीकेवर तितीरमारे शाळेची संरक्षक भिंतीमुळे समोरचे वाहन चालकाला दिसत नव्हते. समोरुन एखादे वाहन येत असल्याचा भास झाल्यामुळे ट्रॅक्टर चालक रवीचे वाहनावरुन नियंत्रण सुटले. अशातच घाबरलेल्या चालकाने ट्रॅक्टरवरुन उडी घेतली. त्यामुळे अनियंत्रीत ट्रॅक्टर ट्रॉलीसह वितरीकेत कोसळला. यावेळी मदतीसाठी या मुलांनी आरडाओरड केली. परंतु, क्षणात सर्व काही संपले. सुनिल वाढीवे व राजकुमार टेकाम यांच्या अंगावर ट्रॅक्टर ट्रॉली कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर सानियाचा तुमसरात उपचारादरम्यान मृत्यू झाला. सचिन टेकाम याची प्रकृती चिंताजनक आहे.
त्यानंतर आंबागड येथील शेकडो नागरिकांनी तुमसर रुग्णालयात धाव घेतली. चारपैकी तिघे तुळशीराम तितीरमारे शाळेचे तर सानिया ही जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी होती. गुरुवारला सायंकाळी या तिन्ही मुलांवर शोकाकुल वातावरणात सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. आंबागड गावात रावणदहणाचा कार्यक्रम रद्द झाला होता. तिथे केवळ हुंदके आक्रोश अन् आक्रोश दिसत होता. सुनिल हा आईवडिलांना एकुलता होता. त्याच्या आईवडीलांचे हुंदके बघून प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. काळ किती क्रुर असतो, याची प्रचिती येत होती. सानियाच्या आईचे डोळे रडून रडून कोरडे पडले होते. संपूर्ण गाव या तीन कुटूंबाला धीर देत होता. पंरतु धीर देणारेच प्रत्येकजण अधीर झाले होते. मृतदेह पाहून अबोल झाले होते.

Web Title: Aamagadat hundke ... arouse .. and resentment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.