९९८ कृषिपंपांना वीज जोडणीची प्रतीक्षा
By Admin | Updated: August 18, 2015 00:44 IST2015-08-18T00:44:50+5:302015-08-18T00:44:50+5:30
भंडारा जिल्हयाचे मुख्य पीक भात असुन या जिल्हयात रोजगाराच्या इतर दुसरी साधने उपलब्ध नसल्याने शेतकरी पारंपारिक व्यवसाय म्हणून शेती करीत आहेत.

९९८ कृषिपंपांना वीज जोडणीची प्रतीक्षा
साकोली उपविभागातील प्रकार : भारनियमन सुरूच, लोकप्रतिनिधीचांही कानाडोळा
साकोली : भंडारा जिल्हयाचे मुख्य पीक भात असुन या जिल्हयात रोजगाराच्या इतर दुसरी साधने उपलब्ध नसल्याने शेतकरी पारंपारिक व्यवसाय म्हणून शेती करीत आहेत. मात्र या शेतकऱ्यांवर कधी निसर्ग तर कधी विज वितरण कंपनीची दृष्ट छाया कारणीभुत ठरुन शेतकऱ्याची पिळवणूक करतात. साकोली तालुक्याचा विचार केल्यास १० वर्षात ४२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे साकोली, लाखनी व लांखादूर तालुक्यात ९९८ कृषीपंपाना विज जोडणीची प्रतिक्षा आहे. यावरुन शासन शेतकऱ्याच्या हिताचे आहे काय हे समजून येते. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी मागील कित्येक वर्षापासून उपेक्षीतांचे जीवन जगत आहे. नेहमी दुष्काळाला कंटाळून शेतकऱ्यांनी कर्ज काढून विहिरी व बोरवेल केल्या व याच पाण्याने शेतीचे उत्पन्न घेऊन कर्ज फेडू या आशेने शेतकऱ्यांनी विज वितरण कंपनीला विज कनेक्शनसाठी अर्ज केला. मात्र दोन दोन वर्षाचा कालावधी लोटुनही शेतकऱ्यांना विज कनेक्शन मिळाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज घेऊन खोदलेल्या विहिरी व बोरवेलचे कर्जही फेडता आले नाही.
रोवणी खोळंबली
कृषी पंपाला विज कनेक्शन नसल्याने काही शेतकऱ्यांची रोवणी खोळंबली असून बरेच शेतकरी विजचोरी करतांना दिसतात. रात्री तारावर वायर लावुन पंप सुरु करतानी व दिवसा काढुन टाकतात. त्यामुळे जमिनीत पाणी साचत नाही. परिणामी रोवणी तर खोळंबली आहेच शिवाय ज्यांची रोवणी झाली त्याची पिके पाण्याअभावी वाळत आहे. ही वास्तविक स्थीति विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्याना दिसत नाही हे आश्चर्यच आहे.
चार वर्षानंतर मिळाले ‘कनेक्शन’
साकोली परिहार यांची जमनापुर शिवारात शेती आहे. परिहार यांनी सन २०१२ लाच आपल्या शेतात बोरवेल केली व कनेक्शनसाठी अर्ज केला या अर्जानुसार त्यांना डीमांड देण्यात आला. परिहार यांनी २०१२ लाच डिमांड भरला. मात्र वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. त्यांना मिटरच मंजुर झाले नाही. हे कारण सांगुन तब्बल ४ वर्षानंतर म्हणजे आॅगस्ट २०१५ मध्ये विद्युत कनेक्शन जोडून दिली अशी शेतकऱ्यांची परिस्थिती आहे. या शेतकऱ्याला मानसिक त्रासापोटी विजवितरण कंपनीने आर्थिक मदत का करु नये असा सवाल आहे.
विद्युत तारांना काठीचा आधार
लाखांदूर : ‘महावितरण आपल्या दारी’ ही योजना शेतकऱ्यांना ुफायदयाची असली तरीपण मागील तीन वर्षापासून ६०० कृषी पंपाचे विद्युत कनेक्शन विद्युत खांबाअभावी काठीच्या आधाराने सुरु असल्याने भर पावसात जिव टांगणीला टाकुन शेतकऱ्यांना कृषी पंप सुरु करण्याची पाळी आली आहे.
तालूक्यात सिंचनासाठी विहिरीच्या पाण्याचा उपयोग केला जातो. त्यासाठी विद्युत कनेक्शन आवश्यक असते. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार हमी योजनेतून सिंचन विहिर बांधकामाचे उद्दीष्ट पूर्ण करीत. तब्बल ६०० सिंचन विहिरीचे बांधकाम पूर्ण केले. त्यासाठी शासनाने विद्युत विभागाने महावितरण आपल्या दारी ही महत्वपूर्ण योजना सुरु करुन प्रत्येक कृषी पंप धारकाला मागणीनुसार विद्युत कनेक्शन देण्यासाठी पूढाकार घेतला. गरज महत्वाची असल्याने अनेकाना अर्ज करुन तात्काळ विद्युत कनेक्शनची मागणी केल्या. पंरतू विद्युत खांबाला पूरवठा नसल्याने व विद्युत कनेक्शनचा मागणी असल्याने या विभागाने तात्काळ सेवा देण्याच्या हेतूने काठीचा आधार घेत विद्युत खांब देण्याची प्रतिक्षा न करता कृषी पंपाचा विद्युत पूरवठा सन २०१३-१५ या वर्षी केला. तीन वर्षाचा कालावधी लोटूनही अद्याप विद्युत खांबाला पूरवठा न झाल्याने भर पावसात शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून लोड शेडिगंच्या नावावर रात्री शेतात कृषी पंप सुरु करण्यासाठी जावे लागते. एकीकडे काठीच्या आधाराने विजेच्या तारा लोंबकळत असतांनी शेतकऱ्यांनी पर्वा न करता मागील तीन वर्षापासून शेती केली परंतु विद्युत खांबाला पुरवठा करण्यात आला नाही. (तालुका प्रतिनिधी)