जिल्ह्यात ९.१२ लाख मतदार
By Admin | Updated: September 13, 2014 01:04 IST2014-09-13T01:04:15+5:302014-09-13T01:04:15+5:30
महाराष्ट्रात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगूल वाजला असून जिल्ह्यातही राजकीय घडामोडीला वेग आला आहे.

जिल्ह्यात ९.१२ लाख मतदार
भंडारा : महाराष्ट्रात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगूल वाजला असून जिल्ह्यातही राजकीय घडामोडीला वेग आला आहे. मतदार राजा पुन्हा एकदा झोतात येणार असून दि.१५ आॅक्टोंबर रोजी होवू घातलेल्या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनही सज्ज झाली आहे. जिल्ह्यात भंडारा, साकोली, तुमसर या तिन्ही विधानसभा मतदार संघात एकूण ९ लक्ष १२ हजार २०८ मतदारांची नोंदणी झाली आहे.
भंडारा जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघानिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झालेली आहे. यात भंडारा विधानसभा मतदार संघाचा क्रमांक ६१, तुमसर ६० तर साकोली विधानसभा मतदार संघाचा क्रमांक ६२ आहे. तुमसर विधानसभा क्षेत्रात मतदान केंद्राची संख्या ३५१ असून भंडारा ४२९ तर साकोली विधानसभा क्षेत्रात ३७१ असे एकूण ११५१ मतदान केंद्र राहणार आहेत.
तुमसर विधानसभा मतदार संघात एकूण मतदार २ लक्ष ८० हजार २०३ असून यापैकी पुरूष मतदारांची संख्या १ लक्ष ४२ हजार ६०५ तर स्त्री मतदारांची संख्या १ लक्ष ३७ हजार ५९८ आहे. भंडारा विधानसभा मतदार संघात एकूण मतदार ३ लक्ष ३७ हजार ६६७ असून पुरूष मतदारांची संख्या १ लक्ष ७१ हजार ३३३ तर स्त्री मतदारांची संख्या १ लक्ष ६६ हजार ३२२ आहे.
साकोली विधानसभा मतदारसंघात एकूण मतदार २ लक्ष ९४ हजार ३३८ असून पुरूष मतदारांची संख्या १ लक्ष ५१ हजार ४८ तर स्त्री मतदारांची संख्या १ लक्ष ४३ हजार २८९ इतकी आहे. जिल्ह्यात तृतीयपंथ मतदारांची नोंदणी शुन्य असल्याची माहिती आहे. दि.३१ जुलै रोजी प्रकाशित नवीन यादीत १४ हजार ५३० मतदार वाढले आहेत. यापैकी तुमसर विधानसभा क्षेत्रात ३ हजार ९४२, भंडारा ७ हजार ३०४ तर साकोलीत ३ हजार २८४ मतदार नव्याने वाढले आहेत. (प्रतिनिधी)