९२ हजार धान उत्पादकांना १९१ कोटींच्या बोनसची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:38 IST2021-03-09T04:38:08+5:302021-03-09T04:38:08+5:30

भंडारा : गोदामांचा अभाव, भरडाईचा गुंता आणि अवकाळी पावसाचा फटका अशा स्थितीत जिल्ह्यात आधारभूत खरेदी केंद्रांवर आतापर्यंत २७ लाख ...

92,000 paddy growers await Rs 191 crore bonus | ९२ हजार धान उत्पादकांना १९१ कोटींच्या बोनसची प्रतीक्षा

९२ हजार धान उत्पादकांना १९१ कोटींच्या बोनसची प्रतीक्षा

भंडारा : गोदामांचा अभाव, भरडाईचा गुंता आणि अवकाळी पावसाचा फटका अशा स्थितीत जिल्ह्यात आधारभूत खरेदी केंद्रांवर आतापर्यंत २७ लाख ३९ हजार ५१७ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. शेतकऱ्यांना आधारभूत किमतीनुसार ३१० कोटी ८७ लाख ७१ हजार रुपयांचे चुकारे अदा करण्यात आले. मात्र, राज्य शासनाने घोषीत केलेल्या बोनसचे अद्यापही चुकारे शेतकऱ्यांना मिळाले नाही. जिल्ह्यातील ९२ हजार ९० शेतकऱ्यांना १९१ कोटी ७६ लाख ६१ हजार रुपयांच्या बोनसची प्रतीक्षा आहे. ही रक्कम केव्हा मिळणार याकडे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

भंडारा जिल्हाप्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. शासकीय आधारभूत खरेदी केंद्रांवर पणन महामंडळाच्या मदतीने धान खरेदी करण्यात येते. जिल्ह्यात १ नोव्हेंबरपासून धान खरेदी करण्यात आली. १४८ केंद्रांवर धान खरेदी झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ९२ हजार ९० शेतकऱ्यांनी २७ लाख ३९ हजार ५१७ क्विंटल धानाची आधारभूत केंद्रांवर विक्री केली. या धानाची आधारभूत किमतीनुसार ५११ कोटी ७४ लाख १९ हजार ३९९ रुपये किमत होते. शेतकऱ्यांच्या खात्यात ३१० कोटी ८७ लाख ७१ हजार २१६ रुपयांचे चुकारे वळते करण्यात आले तर आधारभूत किमतीनुसार अद्यापही २०० कोटी ८६ लाख ४८ हजार १८३ रुपयांचे चुकारे बाकी आहेत.

राज्य शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांना ७०० रुपये बोनस जाहीर केला. आधारभूत किंमत १८६८ आणि त्यावर ७०० रुपये बोनस असा एकूण २५६८ रुपये धानाला दर मिळत आहे. मात्र, आतापर्यंत धानाचे चुकारे करताना आधारभूत किमतीनुसारच शेतकऱ्यांना चुकारे अदा करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना बोनसच्या रकमेची प्रतीक्षा आहे. ९२ हजार ९० शेतकऱ्यांच्या बोनसचे १९१ कोटी ७६ लाख ६१ हजार रुपये होतात. आता ही रक्कम केव्हा मिळणार याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली आहे.

यावर्षी नैसर्गिक संकटाचा सामना धान उत्पादक शेतकऱ्यांना करावा लागला. महापूर, अतिवृष्टी यासह किडींचाही प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होता. अशा स्थितीतही शेतकऱ्यांना धानाचे उत्पादन घेतले. आधारभूत केंद्रावर योग्य किंमत मिळत असल्याने सर्व धान येथेच विकण्यात आला. आता या शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने तत्काळ बोनसची रक्कम अदा करावी, अशी मागणी आहे.

बाॅक्स

निधी उपलब्धतेनुसार मिळणार बोनस

शेतकऱ्यांनी आधारभूत किमतीवर विकलेल्या धानाचा बोनस निधी उपलब्धतेनुसार मिळणार असल्याची माहिती आहे. महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे सरव्यवस्थापक डाॅ. अतुल नेरकर यांनी याबाबत सर्व जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना ५ फेब्रुवारीला पत्र पाठविले. त्यात १ एप्रिलनंतर निधीच्या उपलब्धतेनुसार २ ते ३ टप्प्यांत बोनसची रक्कम उपलब्ध करून देण्यात येईल, असे म्हटले आहे. याबाबत आपल्या स्तरावरून संबंधित सब एजंट व शेतकऱ्यांना अवगत करावे, असेही या पत्रात नमूद करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना आता महिनाभर तरी बोनसच्या रकमेची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

बाॅक्स

अशी झाली तालुकानिहाय खरेदी

तालुका शेतकरी एकूण खरेदी

भंडारा ८०६२ २४७४२९

मोहाडी १३१९८ ३९५१३४

तुमसर १६७७७ ५३०९५८

लाखनी १३१६९ ३५०१४१

साकोली १२८२५ ३५५४५१

लाखांदूर १९१८० ५७६४७५

पवनी ८८७९ २८३९२८

एकूण ९२०९० २७३९५१७

Web Title: 92,000 paddy growers await Rs 191 crore bonus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.