९ लाखांचे चुकारे अडले
By Admin | Updated: August 10, 2014 22:50 IST2014-08-10T22:50:00+5:302014-08-10T22:50:00+5:30
शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकास व्हावा, त्यांचे जीवनमान उंचवावे, खाजगी धान खरेदी व्यापाऱ्याकडून फसवणूक होऊ नये या हेतूने शासनाने आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू ठेवले.

९ लाखांचे चुकारे अडले
२दिघोरी (मोठी) : शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकास व्हावा, त्यांचे जीवनमान उंचवावे, खाजगी धान खरेदी व्यापाऱ्याकडून फसवणूक होऊ नये या हेतूने शासनाने आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू ठेवले. मात्र दिघोरी येथील आधारभूत धान खरेदी केंद्र हे शेतकऱ्यांसाठी आधारहीन केंद्र ठरत आहेत. ४५ दिवसांपासून २९ लक्ष रुपयांचे चुकारे अडल्याने शेतकरी आर्थिक संकटात गुरफटत चालला आहे.
लाखांदूर तालुक्यातील दिघोरी मोठी येथे खरेदी संस्थेमार्फत उन्हाळी आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. या धान खरेदी केंद्रात १६ जून २०१४ ते जुलैपर्यंत २ हजार २८४ क्विंटल धान १३१० रुपये दराने खरेदी करण्यात आले. त्याचे एकूण २९ लक्ष ९२ हजार ४० रुपये मागील दीड महिन्यांपासून धान खरेदी केंद्राकडे थकीत असल्याची माहिती आहे. त्याचा परतावा अजूनही झालेला नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
खऱ्या अर्थाने उन्हाळी धान खरेदी केंद्र हे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणे गरजेचे असते. मात्र शासन, अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या उदासीन धोरणामुळे सदर खान खरेदी केंद्र हे १६ जून रोजी सुरू करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना जवळपास ४५ दिवस धान स्वत:चे घरी भरुन ठेवावे लागले. त्यानंतर धान खरेदी सुरू झाल्यामुळे विकलेले धान ४५ दिवसपर्यंत केंद्रात राहिले. एकूण ९० दिवसांपासून शेतकऱ्याला चुकाऱ्याविना राहावे लागले. नियोजनाचा अभावामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला.
दिघोरी मोठी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी मंडळाने अनेकदा जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. निवेदने दिली, मात्र अजूनपर्यंत त्यांच्या निवेदनावर संबंधित विभागाने कुठलीही दखल घेतली नाही. दुसरीकडे शेतकऱ्यांचे चुकारे अडवून ठेवण्यात आले आहे. शेतकरी मंडळाने निर्णय घेतला आहे की, दि. २० आॅगस्टपर्यंत शेतकऱ्यांचे पूर्ण चुकारे न मिळाल्यास दि. २१ आॅगस्टपासून जिल्हा मार्केटींग कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा मानस व्यक्त केला आहे. (वार्ताहर)