९६ कामगारांचे ठिय्या आंदोलन
By Admin | Updated: February 17, 2016 00:15 IST2016-02-17T00:15:32+5:302016-02-17T00:15:32+5:30
तालुक्यातील माडगी येथे मागील २५ वर्षापासून वाहनांचे सुटे भाग तयार करण्याचा युनिडेरीडेन्ट कारखाना आहे.

९६ कामगारांचे ठिय्या आंदोलन
‘मेक इन इंडिया’चा विसर : कंपनी २७ कामगारांना घेण्याची व्यवस्थापनाची तयारी
तुमसर : तालुक्यातील माडगी येथे मागील २५ वर्षापासून वाहनांचे सुटे भाग तयार करण्याचा युनिडेरीडेन्ट कारखाना आहे. येथे ९६ कंत्राटी कामगार मागील आठ ते दहा वर्षापासून कार्यरत आहेत. कंपनी त्यांना कामावर घेत नसून कामगारांनी कंपनीतच ठिय्या मांडला आहे.
भंडारा कामगार न्यायालयाने कामगारांच्या याचिकेवर स्टे (जैसे थे) असा आदेश दिला. परंतु प्रत्यक्षात कामगार १२ दिवसापासून बेरोजगार झाले आहेत. युनिडेरीडेन्ट कारखान्यात मागील १० ते १५ वर्षापासून कामगार काम करीत आहेत. कारखान्याच्या नियमानुसार, कोणत्याही मजुराने २४० दिवस काम पूर्ण केले की, त्याचा भविष्यनिर्वाह भत्ता कापण्यात येतो तथा कारखान्याच्या सुविधेचा लाभ मिळणे आवश्यक आहे. परंतु या कारखान्यात २४० दिवस पूर्ण होऊनही कामगारांना सुविधेपासून वंचित राहावे लागते. आता कारखान्यातील सर्व ९६ कामगारांना काढून टाकण्यात आले. मजुरांनी न्यायालयात दाद मागितली असून न्यायालयाने निकाल लागेपर्यंत कामावर सामावून घ्या, असा आदेश दिला. परंतु कंपनी व्यवस्थापनाने केवळ २७ कामगारांनाच कामावर घेण्याची तयारी दर्शविली आहे.
याचा निषेध म्हणून सर्व ९६ कामगार मागील १२ दिवसांपासून कंपनीच्या आवारात ठिय्या आंदोलनाला बसले आहेत. सोमवारला आमदार चरण वाघमारे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना कंपनी व्यवस्थापनाशी चर्चेसाठी पाठविले होते. गुरुवारपर्यंत सकारात्मक निर्णय घेऊन सर्व ९६ कामगारांना कामावर घेण्यासाठी कंपनी व्यवस्थापनाला सांगितले. (तालुका प्रतिनिधी)
२७ मजुरांना कामावर सामावून घेत आहोत. जोपर्यंत न्यायालय अंतिम निर्णय देत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना सामावून घेणार नाही. याप्रकरणी दि. २० फेब्रुवारीला न्यायालयाची सुनावणी आहे.
- मुकुंद जुनारकर, व्यवस्थापक,
युनिडेरीडेन्ट कंपनी मानेकनगर.