जिल्ह्यात ८७ टक्के मतदान
By Admin | Updated: February 4, 2017 00:15 IST2017-02-04T00:15:58+5:302017-02-04T00:15:58+5:30
नागपूर विभागीय शिक्षक पदवीधर मतदारसंघांच्या शुक्रवारला झालेल्या निवडणुकीत ८७ टक्के शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

जिल्ह्यात ८७ टक्के मतदान
मतदान प्रक्रिया शांततेत : पदवीधर शिक्षक मतदार संघाची निवडणूक
भंडारा : नागपूर विभागीय शिक्षक पदवीधर मतदारसंघांच्या शुक्रवारला झालेल्या निवडणुकीत ८७ टक्के शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यातील १२ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.
या निवडणुकीत अनिल शिंदे, ना.गो.गाणार, प्रकाश जाधव, राजेंद्र झाडे, आनंद कारेमोरे या प्रमुख उमेदवारांसह १६ उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीसाठी ३,७२१ मतदारांमध्ये २,८४२ पुरूष तर ८७९ महिला मतदारांचा समावेश होता. या निवडणुकीत ३,२३६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
या निवडणुकीसाठी भंडारा जिल्ह्यात नाकाडोंगरी, तुमसर, मोहाडी, भंडारा, सावरी जवाहरनगर, धारगाव, साकोली, लाखनी, पालांदूर, अड्याळ, पवनी, लाखांदूर या मतदान केंद्रांवर मतदानासाठी शिक्षक मतदारांची गर्दी झाली होती. या निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी शिक्षक मतदारांना शुक्रवारला विशेष नैमित्तिक रजा देण्यात आली होती. मतदारांना मतदानासंबंधी माहिती मिळावी, यासाठी विविध मतदान केंद्रांबाहेर विविध राजकीय पक्षाच्या उमेदवारांकडून बुथ लावण्यात आले होते. या निवडणुकीची मतमोजणी सोमवार, ६ फेब्रुवारी रोजी सेंट ऊसुर्ला हायस्कूल नागपूर येथे होणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)