जलयुक्त शिवारची ८६ गावे ‘वॉटर न्युट्रल’
By Admin | Updated: April 21, 2017 00:39 IST2017-04-21T00:39:38+5:302017-04-21T00:39:38+5:30
महाराष्ट्र शासनाने दुष्काळावर मात करण्यासाठी सुरु केलेल्या जलयुक्त शिवार योजनेचे दृश्य परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे.

जलयुक्त शिवारची ८६ गावे ‘वॉटर न्युट्रल’
सातही तालुक्यातील गावांचा समावेश : तर सिंचनक्षेत्रात होणार वाढ
भंडारा : महाराष्ट्र शासनाने दुष्काळावर मात करण्यासाठी सुरु केलेल्या जलयुक्त शिवार योजनेचे दृश्य परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे. भंडारा जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेत २०१५-१६ मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या ८६ गावांपैकी ८६ गावे शंभर टक्के ‘वॉटर न्युट्रल’ झाली आहे.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत भंडारा जिल्ह्यात सन २०१५-१६ मध्ये एकूण ८६ गावांची निवड करण्यात आली होती. यात भंडारा तालुका-१५, तुमसर-१९, मोहाडी-१५, पवनी-१२, लाखांदूर-६, साकोली-१० व लाखनी ९ अशा ८६ गावांचा समावेश होता. या गावात एकूण प्रस्तावित १३७० कामांपैकी १११९ कामे पूर्ण झाली आहेत.
शिवारात पावसाचे पडलेले पाणी व अडवलेले आणि जिरवलेले पाणी यांचा ताळेबंद करण्याची पध्दत जलयुक्त शिवारमध्ये ठरवून दिलेली आहे. त्यानुसार गावाची सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता जलयुक्त शिवारच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामामुळे पावसाच्या पाण्याचा जमा खर्च व ताळेबंद तयार करणे म्हणजेच वॉटर न्युर्ट्रल टक्केवारी होय. प्रकल्प आराखड्यानुसार सन २०१५-१६ अंतर्गत निवडलेल्या गावांपैकी वॉटर न्युट्रल टक्केवारीनुसार ८६ पैकी ८६ गावे शंभर टक्के "वॉटर न्युट्रल" झालेली आहेत. शंभर टक्के वॉटर न्युट्रल झालेली गावे तालुकानिहाय भंडारा-माटोरा, कवलेवाडा, पलाडी, गोलेवाडी, इटगाव, मानेगाव, नवरगाव, खुर्शीपार, गराडा बु., गराडा खु., मंडणगाव, सिल्ली, मकरधोकडा, खमारी बु., व मांडवी. मोहाडी- मोहगाव, बच्छेरा, टांगा, देवाडा बु., नरसिंहटोला, फुटाळा, भिकारखेडा, पारडी, पिंपळगाव (क), कांद्री, शिवणी, खैरलांजी, बोरी (क), करडी, उसर्रा. तुमसर- गर्रा बघेडा, दावेझरी (सी), आसलपाणी, मेहगाव, साखळी, चिखला, कोष्टी, खापाखुर्द, गोंडीटोला, पवनारा, गोबरवाही, पवनारखारी, सितासावंगी, कार्ली, रोंघा, आलेसूर, लेंडेझरी, नवरगाव, येरली. पवनी- मिन्सी, पन्नासी, भिकारमिन्सी, शेगाव, चकारा, सुरबोडी, चिचाळ, अड्याळ, कमकाझरी, तिर्री, कलेवाडा, खैरी. साकोली- सातलवाडा, रेंगेपार, सालेबर्डी, जांभळी, मालूटोला, उसगाव, पार्थी, बरडकिन्ही, सेंदुरवाफा, पळसगाव. लाखनी- मोरगाव, खैरी, पिंपळगाव, सिपेवाडा, ढिवरखेडा, मेंढा/भूगाव, केसलवाडा, राजेगाव, झरप. लाखांदूर- तावशी, टेंभरी, कुडेगाव, तई बु., आसोला व इटान अशा ८६ गावांचा समावेश आहे. सन २०१६-१७ मध्ये ५९ गावांची निवड करण्यात आली असून या गावात २३७९ कामे प्रस्तावित आहेत. यापैकी अनेक कामांना सुरुवात झाली असून ते प्रगतीपथावर आहे. जलयुक्त शिवारमुळे गावांच्या सिंचन क्षमतेत निश्चितच वाढ होणार आहे. (प्रतिनिधी)