844 positives in the district; Death of one | जिल्ह्यात ८४४ पॉझिटिव्ह; एकाचा मृत्यू

जिल्ह्यात ८४४ पॉझिटिव्ह; एकाचा मृत्यू

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांची प्रतिबंधित क्षेत्राला भेट

लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात दररोज पॉझिटिव्ह कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, रविवारी नव्याने ८४४ रुग्णांची भर पडली. दोन दिवसातील हा आकडा सर्वाधिक आहे. कोरोनाने एकाचा मृत्यू झाला. आता कोरोनाबळींची संख्या ३५२ झाली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत २० हजार ८६१ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले असून, त्यापैकी १५ हजार ५३० व्यक्ती कोरोनामुक्त झालेत, तर ४९७९ व्यक्ती उपचाराखाली आहेत. गत वीस दिवसांपासून दररोज कोरोना रुग्णांची संख्या चढत्या क्रमाने वाढत आहे. शुक्रवारी २२०३ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली.
त्यात भंडारा तालुक्यात ३६२, मोहाडी १४२, तुमसर ७३, पवनी ११६, लाखनी ७९, साकोली ३१ आणि लाखांदूर तालुक्यात ४१ असे ८४४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. भंडारा तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता ९०६१ झाली असून, मोहाडी १७१४, तुमसर २६१७, पवनी २३३०, लाखनी २१९६, साकोली २०९८, लाखांदूर ८४५ झाली आहे. 
आतापर्यंत दोन लाख १ हजार ६४ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात २० हजार ८६१ कोरोनाबाधित आढळून आले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७४.४४ तर जिल्ह्याचा मृत्युदर ०१.६८ टक्के एवढा आहे.

जिल्हाधिकाऱ्यांची प्रतिबंधित क्षेत्राला भेट
 भंडारा शहरातील प्रतिबंधित क्षेत्राला जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी भेट देऊन पाहणी केली. जास्त व्यक्ती कोरोना संक्रमित झाल्यामुळे प्रशासनाने काही ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहे. जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी साई मंदिर परिसर, पिंडकेपार गणेशपूर, गणेशपूर बाजार, केसलवाडा व मौजा दाभा आदी ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या नागरिकांनी घरा बाहेर फिरू नये असे आवाहन त्यांनी केले. आपल्यामुळे इतर कोणी व्यक्ती संक्रमित होणार नाही, याची जबाबदारी आपलीच असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. प्रतिबंधित क्षेत्रात नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी त्यांच्या सोबत तहसीलदार अक्षय पोयाम, गट विकास अधिकारी नूतन सावंत, मुख्याधिकारी विनोद जाधव व अन्य अधिकारी उपस्थित होते.

 

Web Title: 844 positives in the district; Death of one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.