हातभट्टींवरील धाडीत आठ लाखांची दारू जप्त
By Admin | Updated: June 29, 2015 00:51 IST2015-06-29T00:51:47+5:302015-06-29T00:51:47+5:30
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता ४ जूनपासून जिल्ह्यात लागू झाली आहे.

हातभट्टींवरील धाडीत आठ लाखांची दारू जप्त
निवडणुकीसाठी दक्ष : राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
गोंदिया : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता ४ जूनपासून जिल्ह्यात लागू झाली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने यादरम्यान सुरू केलेल्या धाडसत्रात जिल्ह्यात विविध ठिकाणी हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या. त्यात मोहाफुल व देशी दारूवरील धाडीत ६८ गुन्हे नोंदवून ३७ आरोपींना अटक करण्यात आली.
२२ ते २४ जूनदरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या नेतृत्वात राबविलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने व पोलीस विभागाच्या सहकार्याने जिल्ह्यात विविध ठिकाणी धाडी घालून २२ गुन्हे नोंदविले. त्यामध्ये १२ वारस गुन्हे व १० बेवारस भट्ट्यांचा समावेश आहे. त्यातील १२ आरोपींना अटक केली. तसेच मोहा सडवा १४,११० लिटर, मोहा दारू ५१८ लिटर आणि इतर साहित्य जप्त केले. त्याची एकूण किंमत ३ लाख ६७ हजार २९५ रुपये आहे. ५ ते २० जूनदरम्यान मोहा सडवा ३००० लिटर, मोहा दारु १५३ लिटर, देशी दारू ६ लिटर व हातभट्टी दारु तयार करण्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण ३ लाख ५४ हजार ६३३ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून २७ आरोपींना अटक केली. त्यात ४६ गुन्हे नोंदविण्यात आले. (जिल्हा प्रतिनिधी)
विभाग झाला दक्ष
अवैध दारू निर्मिती, विक्री केंद्रे तसेच हातभट्ट्या समूळ नष्ट करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक बी.जी. भगत, दुय्यम निरीक्षक संजय बोडेवार, एम.के. चिमटवार, आर.के. निकुंभ, हुमे, जी.एच. भगत, एस.बी. रहांगडाले, मुनेश्वर, बंसोड, उईके, फुंडे व वाहन चालक मडावी, सोनबरसे यांनी कारवाई करून ७ लाख २१ हजार ९१८ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.