मुरुम खननप्रकरणी ठोठावला ८ लाखांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 00:43 IST2017-11-21T00:42:49+5:302017-11-21T00:43:20+5:30
मौजा साकोली येथील गट नंबर २५२ मधील आराजी ०.९३ हे आर जागेच्या अकृषक लेआऊटमध्ये अवैधरित्या १५० ब्रास मुरुम टाकून पसरविल्याबद्दल सुमीत लंजे व इतर १० जणांविरुध्द ८ लक्ष १० हजार रुपयाचा दंड ठोठावला आहे.

मुरुम खननप्रकरणी ठोठावला ८ लाखांचा दंड
आॅनलाईन लोकमत
साकोली : मौजा साकोली येथील गट नंबर २५२ मधील आराजी ०.९३ हे आर जागेच्या अकृषक लेआऊटमध्ये अवैधरित्या १५० ब्रास मुरुम टाकून पसरविल्याबद्दल सुमीत लंजे व इतर १० जणांविरुध्द ८ लक्ष १० हजार रुपयाचा दंड ठोठावला आहे. ही कार्यवाही उपविभागीय अधिकारी अर्चना मोरे व तहसिलदार अरविंद हिंगे यांनी केली आहे.
सदर प्रकरणात सुमित लंजे व इतर १० जणांनी अवैधरित्या मुरुमाचे अवैध उत्खनन करुन गडकुंभली रोडवरील लेआऊटमध्ये १५० ब्रास मुरुम टाकून त्याला पसरविले. याप्रकरणी रॉयल्टीचे ६० हजार रुपये व दंड म्हणून ७ लक्ष ५० हजार रुपये असे एकुण ८ लाख १० हजार रुपयांची दंडात्मक कार्यवाही करण्यात आली आहे.
यात वापरण्यात आलेली जेसीबी व ट्रॅक्टरवर कार्यवाही करुन सोडण्यात आले आहे. सदर कार्यवाही ही ३ तारखेला करण्यात आली आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात गौण खनिजांची अवैधरित्या वाहतूक होत असते. याकडे कधीकधी दुर्लक्षही होते.
जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
या तक्रारीप्रमाणे तलाठी यांनी ३ ला दुपारी अंदाजे ३ वाजताचे सुमारास तहसीलदार व तलाठी यांनी मुरुम पसरवित असलेल्या जेसीबीचा पंचनामा करुन कार्यवाही केली व जेसीबी तहसील कार्यालयात जमा करण्यास सांगितले. मात्र जेसीबी तहसील कार्यालयात जमा करण्यात आली नाही. दुसºया दिवशी हा टाकलेला मुरुम एका ट्रॅक्टरने पसरविण्यात आला. ५ ला अरुण मोटघरे यांच्या माहितीवरुन रामु लांजेवार यांनी मुरुम टाकल्याचे कबुल केले. यादे लांजेवार यांनी ३ ट्रॅक्टर मुरुम भरलेले व १ रावडीवाला ट्रॅक्टर जप्ती करुन तहसील कार्यालयात आणला. यापैकी दोन ट्रॅक्टर रॉयल्टी असल्यामुळे सोडून दिली व रावडी लावलेला ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जप्ती करुन ठेवला. काही दिवसानंतर म्हण्जो १८ ला उपविभागीय अधिकारी यांनी दंडाची रक्कम ८ लक्ष १० हजार रुपये भरा नाहीतर ट्रॅक्टर सोडता येणार नाही असे सांगितले. ३ ला झालेल्या अवैध मुरुम उत्खननासंबंधी माझा काहीही संबंध नाही तरीही माझा ट्रॅक्टर जप्त करण्यात आला अशी तक्रार रामु लांजेवार यांनी जिल्हाधिकारी यांना केली आहे.
आमरण उपोषणाचा इशारा
च्या अवैध मुरुम उत्खननाप्रकरणी माझा कुठलाही संबंध नसताना ट्रॅक्टर जप्त करण्यात आला. या अन्याया विरोधात उद्या २१ नोव्हेंबरपासुन रामु लांजेवार कुटुंबीयासोबत तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसेल, असा इशाराही लांजेवार यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.