भंडारा जिल्हा परिषदेच्या ७८१ शाळा डिजीटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 22:00 IST2019-01-19T22:00:22+5:302019-01-19T22:00:50+5:30

माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे पडू नये म्हणून जिल्हा परिषदेने समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून शाळा डिजीटल करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील तब्बल ७८१ शाळा डिजीटल झाल्या असून या ठिकाणी माहिती तंत्रज्ञानाचे अद्यवत शिक्षण ग्रामीण विद्यार्थी घेत आहेत.

781 schools of Bhandara Zilla Parishad have digitized | भंडारा जिल्हा परिषदेच्या ७८१ शाळा डिजीटल

भंडारा जिल्हा परिषदेच्या ७८१ शाळा डिजीटल

ठळक मुद्देसमग्र शिक्षा अभियान : ग्रामीण विद्यार्थी घेत आहेत माहिती तंत्रज्ञानाचे धडे

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे पडू नये म्हणून जिल्हा परिषदेने समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून शाळा डिजीटल करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील तब्बल ७८१ शाळा डिजीटल झाल्या असून या ठिकाणी माहिती तंत्रज्ञानाचे अद्यवत शिक्षण ग्रामीण विद्यार्थी घेत आहेत.
शहरी भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये तंत्रज्ञानाचे शिक्षण योग्य वेळी मिळते. मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थी माहिती तंत्रज्ञानापासून दूर असतात. विशेष म्हणजे ग्रामीण भागात सर्वाधिक जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. या शाळांमध्ये ग्रामीण भागातील गोरगरीबांची मुले शिकतात. ही मुले स्पर्धेच्या युगात मागे पडू नये यासाठी भंडारा जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शाळा डिजीटल करण्याचा प्रयत्न सुरु आहे. आतापर्यंत ७८१ शाळा डिजीटल झाल्या असून या शाळांमध्ये माहिती तंत्रज्ञानाचे धडे विद्यार्थ्यांना दिले जात आहे.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. त्यांना एक जबाबदार नागरिक आणि सक्षम होण्यासाठी तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण दिले जात आहे. भंडारा जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये डिजीटल वर्गखोली ही संकल्पना राबविली जात आहे. यासाठी मुख्याध्यापक आणि शिक्षकांसाठी कार्यशाळाही आयोजित करण्यात आली होती. या अभियानाच्या माध्यमातूनच जिल्हा परिषद शाळा डिजीटल केल्या जात आहेत.
आमदार विकास निधीतून जिल्ह्यात २ हजार ३४३ वर्गखोल्या डिजीटल करण्यात आल्या आहेत. या वर्गामध्ये संगणक, प्रोजेक्टर, एलसीडी, टीव्ही आणि इंटरनेटची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. चलचित्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकविल्या जात असल्याने विषय चटकन समजतो.
सातही तालुक्यातील शाळांचा समावेश
जिल्हा परिषद आणि स्थानिक व्यवस्थापनाच्या सातही तालुक्यातील शाळांमधील वर्गखोल्या डिजीटल करण्यात आल्या आहेत. त्यात भंडारा जिल्ह्यातील १५१ शाळा, मोहाडी ९८, तुमसर १७३, साकोली ८४, पवनी १०६, लाखनी ९१, लाखांदूर ७८ शाळांचा समावेश आहे. यासोबतच भंडारा तालुक्यातील १२८ शाळा, मोहाडी ८९, तुमसर ९३, साकोली ९४, पवनी १२०, लाखनी ८९, लाखांदूर ८० अशा ६९३ शाळा प्रगत शाळांमध्ये परावर्तीत झाल्या आहेत.

माहिती आणि तंत्रज्ञानाच्या या युगात शहरी विद्यार्थ्यांसोबत ग्रामीण विद्यार्थी स्पर्धेत टिकावे यासाठी शाळांचे डिजीटलायझेशन केले जात आहे. पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आतापर्यंत २ हजार ३४३ वर्गखोल्या डिजीटल झाल्या आहेत.
-प्रकाश काळे, जिल्हा समन्वयक, समग्र शिक्षा अभियान, भंडारा

Web Title: 781 schools of Bhandara Zilla Parishad have digitized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.