७५३ पूरग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:32 IST2021-03-07T04:32:24+5:302021-03-07T04:32:24+5:30
गत खरीप हंगामात तुमसर तालुक्यात नद्यांना मोठा पूर आला होता. नदीकाठावरील गावांतील शेतकऱ्यांचे धान पीक उद्ध्वस्त झाले होते. अनेकांचे ...

७५३ पूरग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित
गत खरीप हंगामात तुमसर तालुक्यात नद्यांना मोठा पूर आला होता. नदीकाठावरील गावांतील शेतकऱ्यांचे धान पीक उद्ध्वस्त झाले होते. अनेकांचे पीक सडले. त्यामुळे त्यांच्यावर संकट कोसळले होते. दरम्यान, शेतीची पाहणी करण्यासाठी सत्ताधारी व विरोधी पक्ष नेते येऊन गेले. त्यानंतर शेतीचे पंचनामे महसूल प्रशासनाने केले. त्यातही बराच अवधी निघून गेला. नुकसानभरपाईपोटी शासनाने चार कोटी १४ लाख रुपये मंजूर केले. त्यापैकी ३ कोटी ८१ लाख रुपये पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. त्यात चार हजार ५३३ लाभार्थ्यांचा समावेश आहे. अन्य ७५३ पूरग्रस्त लाभार्थी असून, त्यांना तांत्रिक कारणामुळे पूरग्रस्त निधी मिळालेला नाही. यात बँक खात्यामध्ये तफावत असल्याची माहिती आहे. संबंधित शेतकऱ्यांनी महसूल प्रशासनाकडे संपर्क साधण्याचे आवाहन तहसीलदार बाळासाहेब तेळे यांनी केले आहे.
बॉक्स
पूरबाधित कुटुंबांना ७० लाखांचे वाटप
तुमसर तालुक्यातील अनेक घरांचे पुरामुळे नुकसान झाले होते. काहींचे घर पडले होते तर काहींच्या घरात पाणी शिरले होते. अशांची संख्या मोठी होती. यापैकी १४०० कुटुंबांना पुराचा फटका बसला होता. या कुटुंबीयांच्या बँक खात्यावर ७० लाखांचा निधी जमा करण्यात आला आहे. दरम्यान, ज्या पूरबाधित व पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनपर्यंत रक्कम जमा झाली नाही त्यांच्याशी प्रत्यक्ष महसूल प्रशासनाचे तलाठी, मंडळ अधिकारी व स्थानिक स्तरावर कोतवालांनी संपर्क साधून तांत्रिक कारणांची माहिती तत्काळ जमा करावी, अशी मागणी पंचायत समितीचे सदस्य हिरालाल नागपुरे यांनी केली आहे.