७५ टक्के मतदान
By Admin | Updated: July 5, 2015 00:34 IST2015-07-05T00:34:42+5:302015-07-05T00:34:42+5:30
जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या सात पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारला (दि.४) जिल्ह्यातील एक हजार मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

७५ टक्के मतदान
जि.प.,पं.स.निवडणूक : ८४३ उमेदवारांचे भाग्य यंत्रबद्ध
भंडारा : जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या सात पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारला (दि.४) जिल्ह्यातील एक हजार मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यात सरासरी ७५ टक्के मतदान झाले असून जिल्ह्यातील ८४३ उमेदवारांचे भाग्य मशिनबंद झाले.
जिल्हा परिषदेच्या ५२ जागांसाठी रिंगणात ३१० आणि पंचायत समितीच्या १०४ जागांसाठी ५३३ असे एकूण ८४३ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. ग्रामीण राजकारण ढवळून काढणाऱ्या या निवडणुकीत मतदानासाठी नागरिकांमध्ये उत्साह दिसून आला. युवा मतदारांसोबतच वयोवृद्ध मतदारही मतदानाचा हक्क बजावण्यात आघाडीवर होते. संवेदनशील भागातही मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभागी झाले होते. दिवसभरात टप्याटप्याने मतदानाच्या टक्केवारी सायंकाळपर्यंत वाढत गेली.
तुमसर तालुक्यात १६४ मतदान केंद्रावर दुपारी ३.३० वाजता ५४.२० टक्के मतदान झाले होते. साकोली तालुक्यातील सानगडीजवळील सानगाववासीाांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याचे मतदानानंतर उघडकीस आले. सानगाव येथे मतदान केंद्र न देता कलधरा येथे तीन कि.मी. अंतरावर दिले होते. मतदान केंद्र सानगाव येथेच देण्याची विनंती करुनही त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे मतदान केले नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. जवाहरनगर परिसरात मतदार यादीतील क्रमांक व बीएलओ यांनी पाठविलेल्या पावती क्रमांकात तफावत आढळून आल्यामुळे अनेक मतदारांना आल्यापावली परतावे लागले. (लोकमत चमू)
मतदानात महिलांची आघाडी
या निवडणुकीत महिलांसाठी ५० टक्के आरक्षण असून आजच्या निवडणुकीत महिला मतदारांची संख्या ३.७२ लाख आहे. सकाळपासूनच अनेक केंद्रांवर महिलांची वेगळी रांग लागलेली दिसून आली. त्यामुळे मतदानात महिलांचा टक्का वाढण्याची शक्यता आहे. संध्याकाळी महिलांची गर्दी दिसून आली.
४ग्रामीण क्षेत्रातील अनेक मतदारांना निवडणूक विभागातर्फे देण्यात येणारे मतदानपत्र घरी पोहचले नाही. परिणामी, बहुतांश केंद्रावर मतदानासाठी आलेल्या मतदारांना यादीतील नावे शोधावी लागली. प्रत्येक मतदान केंद्राच्या परिसरात पक्षातर्फे मतदारांसाठी मतदान अनुक्रमांक सांगण्यासाठी बुथ लावलेले होते.