७२६ शाळांना ‘हॅण्डवॉश स्टेशन’ची प्रतीक्षा

By Admin | Updated: February 21, 2017 00:18 IST2017-02-21T00:18:44+5:302017-02-21T00:18:44+5:30

जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी शिक्षण विभागाने सर्व शाळांमध्ये ‘हॅण्ड वॉश स्टेशन’ची निर्मिती करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

726 schools waiting for the 'Handwash Station' | ७२६ शाळांना ‘हॅण्डवॉश स्टेशन’ची प्रतीक्षा

७२६ शाळांना ‘हॅण्डवॉश स्टेशन’ची प्रतीक्षा

४३ शाळांना मिळाला निधी : जिल्हा परिषद शाळा प्रगत शैक्षणिक उपक्रमापासून दूर
प्रशांत देसाई भंडारा
जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी शिक्षण विभागाने सर्व शाळांमध्ये ‘हॅण्ड वॉश स्टेशन’ची निर्मिती करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र जिल्ह्यातील ७६९ शाळांपैकी केवळ ४३ शाळांमध्ये ‘हॅण्ड वॉश स्टेशन’ची उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ७२६ शाळा अजूनही ‘हॅण्ड वॉश स्टेशन’च्या प्रतीक्षेत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यात इयत्ता पहिली ते आठवीच्या ७६९ शाळा आहेत. या शाळांमध्ये ५७ हजार ९०७ विद्यार्थी विद्यार्जन घेत आहेत. यात इयत्ता पहिले ते पाचवीचे २२ हजार ३४० तर इयत्ता सहावी ते आठवीच्या ३५ हजार ५६७ विद्यार्थ्याचा समावेश आहे. सर्व शिक्षा अभियान व शालेय पोषण आहार अंतर्गत जिल्ह्यातील ४३ शाळांमध्ये ‘हॅण्ड वॉश स्टेशन’ची निर्मिती करण्यात आली आहे. यात सर्व शिक्षा अभियान अंतर्गत ३५ तर शालेय पोषण आहार अंतर्गत ८ जिल्हा परिषद शाळांमध्ये याची निर्मिती केलेली आहे. ७६९ शाळा असतांनाही राज्याच्या शिक्षण विभागाने केवळ ४३ शाळांमध्ये ‘हॅण्ड वॉश स्टेशन’ उभारण्यासाठी हा निधी देवून अन्य शाळांसोबत दुजाभाव केल्याचे दिसून येते. संसर्गजन्य आजाराचे प्रमाण जास्त आहे. डायरिया सारख्या आजारामुळे रुग्णालयात भरती होणा-या शालेय मुलामुलींचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. असा अहवाल खुद्द आरोग्य विभागाने मागील वर्षी सादर केला होता. त्यामुळे ‘स्वच्छ विद्यालय, स्वच्छ महाराष्ट्र’ च्या संकल्पनेतून प्रत्येक शाळेतच ‘हॅण्ड वॉश स्टेशन’ उभारण्याची अमंलबजावणी राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये करण्याचे आदेश शिक्षण सचिव नंदकुमार यांनी दिले होते.
नाविन्यपुर्ण योजनेंतर्गत सर्व शिक्षा अभियान विभागाला मागील वर्षी पाच लाखांचा निधी प्राप्त झाला होता. या निधीतून पटसंख्येनुसार काही शाळांना हॅण्ड वॉश स्टेशनच्या निर्मितीसाठी निधी देण्यात आला. शंभरच्या वर पटसंख्या असलेल्या शाळांना १५,००० रुपये तर शंभरच्या आतील शाळांना १०,००० रुपये देण्यात आले. यात शंभरच्या वरील ३० शाळांचा तर शंभरच्या आतील ५ शाळांचा अशा ३५ शाळांचा समावेश आहे. शालेय पोषण आहारांतर्गत एका पंचायत समितीकरिता २० हजार रुपये असे २ लाख १० हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. त्यात आठ जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘हॅण्ड वॉश स्टेशन’ची निर्मिती करण्यात आली.

या शाळांमध्ये ‘हॅण्ड वॉश स्टेशन’
सर्व शिक्षा अभियानांतर्गत भंडारा पं.स. तालुक्यातील दाभा, मांडवी, कचरखेडा, हत्तीडोई, दवडीपार (बाजार), मोहाडी येथे मोहगाव (देवी), जि.प. कन्या मोहाडी, नेरी, कांद्री, हरदोली. तुमसर येथे पाथरी, बाम्हणी, चिखला (मराठी) डोंगरी (बु), ढोरवाडा. लाखनी येथे गडेगाव, पेंढरी, गराडा, पालांदूर, खराशी. साकोली येथे साकोली क्र. २, एकोडी, पिंडकेपार, सुकडी, विर्शी, लाखांदूर येथे जैतपूर, तावशी, दिघोरी क्र. १, पिंपळगाव (कोहळी), चिचोली तर पवनी येथे अत्री, सोमनाळा (बु), चिचाळ येथे मुलींची शाळा, उत्तरबुनियादी अड्याळ विरली (खंदाळ) या शाळांचा समावेश आहे. तर शालेय पोषण आहारांतर्गत मोहाडी येथील खमारी (बु), तुमसर येथील सिंदपुरी, लाखनी येथील जि.प. प्राथमिक शाळा लाखोरी, पवनी येथील नेरला, भंडारा येथील कोथुर्णा व सिल्ली, साकोली येथील जि.प. शाळा साकोली, लाखांदूर येथील जि.प. शाळा विरली या शाळांचा समावेश आहे.
२० विद्यार्थ्यांमागे एक नळ
मुलांनी मध्यान्ह भोजनापुर्वी योग्य पध्दतीने सात पायऱ्या चढून हात धुणे आवश्यक आहे. १० मिनीटात सर्व मुलांना हात धुण्यासाठी २० विद्यार्थ्यांमागे एका नळाची तोटी आवश्यक आहे. मात्र अनेक शाळांमधील पटसंख्या अधिक असल्याने तेथे ही परिस्थिती वेगळी दिसून येत आहे.

शाळांची प्रगती
थांबणार
शिक्षण विभागाने राज्यातील शाळा प्रगत करण्यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, शाळासिध्दी, स्वच्छ शाळा सोबतच डिजीटल शाळा व आयएसओ नामांकन या विविध योजनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश शाळांना दिलेले आहे. यात गुणांकन मिळण्यासाठी सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक सुविधा असणे गरजेचे आहे. मात्र जिल्ह्यातील ७२६ शाळांमध्ये हॅण्ड वॉश स्टेशन नसल्याची बाब समोर आल्याने या शाळा प्रगत शैक्षणिक उपक्रमातून वगळण्यात येण्याची भीती वर्तविण्यात येत आहे.

Web Title: 726 schools waiting for the 'Handwash Station'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.