शिवस्मारकाच्या जलपुजनासाठी जाणार ७० नद्यांचे पाणी

By Admin | Updated: December 23, 2016 00:34 IST2016-12-23T00:34:57+5:302016-12-23T00:34:57+5:30

मुंबईजवळच्या अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे जलपूजन

70 rivers of water for Shivshammar's waterfowl | शिवस्मारकाच्या जलपुजनासाठी जाणार ७० नद्यांचे पाणी

शिवस्मारकाच्या जलपुजनासाठी जाणार ७० नद्यांचे पाणी

जिल्हाधिकाऱ्यांची पत्रपरिषद : मुबंईत होणार कार्यक्रम
भंडारा : मुंबईजवळच्या अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे जलपूजन व भूमिपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २४ डिसेंबरला होत आहे. या भूमिपूजन सोहळ्यासाठी राज्यातील जनतेने उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली.
राजभवनापासून जवळच असणाऱ्या समुद्रातील बेटावर जगातील सर्वात उंच असे हे स्मारक असेल. हा कार्यक्रम अधिक संस्मरणीय ठरावा यासाठी राज्यातील ७० हूनअधिक प्रमुख नद्यांचे जल आणि गड किल्यांवरची पवित्र माती या ठिकाणी आणली जाणार आहे.
राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतराष्ट्रीय दर्जाचे स्मारक मुंबई लगत अरबी समुद्रात उभारण्याचा निर्णय २००२ मध्ये घेण्यात आला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आॅक्टोबर २०१४ मध्ये राज्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर स्मारकाच्या कामास गती दिली.
असामान्य कामगिरीने महाराष्ट्राची पताका जगभरात फडकवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्राच्या वतीने हे अनोखे वंदन असेल. महाराष्ट्राच्या तेजस्वी आणि गौरवशाली इतिहासाचे प्रतिबिंब या स्मारकाच्या माध्यमातून अनुभवता येणार आहे. त्यामुळे प्रकल्पाचे अनोखे व विशिष्ट स्वरुप लक्षात घेऊन प्रकल्पाचा आराखडा, निविदा कागदपत्रे तयार करणे, प्रकल्पावर देखरेख करणे यासाठी दि. ११ एप्रिल २०१६ रोजी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नेमणूक करून त्यानंतर प्रकल्प आराखडा मंजूर करण्यात आला आहे.
या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यामध्ये २३०० कोटी रूपयांची कामे प्रस्तावित आहेत. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा १९२ मीटर उंचीचा पुतळा उभारण्याचे प्रारंभी नियोजन होते. आता या पुतळ्याची उंची २१० मीटर इतकी वाढविण्यासाठी पर्यावरण विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या स्मारकात महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित कला दालन, प्रदर्शन गॅलरी, महाराजांच्या चरित्रावर आधारित पुस्तकांचे सुसज्ज वाचनालय, प्रेक्षक गॅलरी, हेलीपॅड, अती महत्वाच्या व्यक्ती व जनतेसाठी जेट्टी, सुरक्षाविषयक व्यवस्थेचा समावेश राहणार आहे. काम सुरू झाल्यानंतर ३६ महिन्यात स्मारक पूर्ण करण्याचे सरकारचे नियोजन असून ते भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. महाराजांची जीवनमुल्ये प्रदर्शित करणारे देशभक्तीपर माहिती केंद्रही या स्मारकात असेल. पर्यटकांसाठी पर्यटनस्थळ असणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 70 rivers of water for Shivshammar's waterfowl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.