६९ पशुधनांचा ‘सातवा महिना’

By Admin | Updated: April 30, 2017 00:23 IST2017-04-30T00:23:52+5:302017-04-30T00:23:52+5:30

शीर्षक वाचून बहुदा आश्चर्य वाटले असेल, परंतु हे खरे आहे. भंडारा पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या मानेगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या चमूने पशुधनांचा सातवा महिना साजरा केला, ...

69 'The seventh month' of the cattle | ६९ पशुधनांचा ‘सातवा महिना’

६९ पशुधनांचा ‘सातवा महिना’

पशुपालकांना दिली भेटवस्तू : मानेगाव पशुवैद्यकीय दवाखान्याचा उपक्रम
प्रशांत देसाई भंडारा
शीर्षक वाचून बहुदा आश्चर्य वाटले असेल, परंतु हे खरे आहे. भंडारा पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या मानेगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या चमूने पशुधनांचा सातवा महिना साजरा केला, आणि तोही धूमधडाक्यात. आजपर्यंत आपण गर्भवती महिलांचाच सातवा महिना होत असल्यासे बघितले. परंतु मानेगाव येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. गुणवंत भडके यांच्या कल्पनेतून हा अभिनव ‘सातवा महिना’ शनिवारला जागतिक पशुवैद्यकीय दिनाचे औचित्य साधून मानेगाव येथे पार पडला.
एखाद्या घरात सनई चौघडे वाजल्यानंतर काही महिन्यात त्या घरी पाळणा हालण्याची तयारी सुरू होते. मुलीला दिवस गेल्यानंतर भारतीय संस्कृतीनुसार ‘सातवा महिना’ मोठ्या आनंदात साजरा केल्या जातो. मात्र, पाळीव पशुधनांचा सातवा महिना साजरा केला असे कोणी म्हटल्यास त्यावर विश्वास बसणार नाही किंवा सांगणाऱ्यांना मुर्खात काढण्यात येईल. परंतु हे सत्य आहे.
भंडारा येथे एक, दोन नाही तर तब्बल ६९ पाळीव पशुधनांंचा सातवा महिना मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मानेगांव (बाजार) येथील पशुवैद्यकीय दवाखाना येथे केवळ गायींचाच नाही तर म्हशींचाही सातवा महिना कार्यक्रम राबविला. यात गावातील ज्या गायी-म्हशी सात महिन्याच्या गरोदर आहेत, अशा ५७ गायी व १२ म्हशीच्या पशुपालकांना या कार्यक्रमाची माहिती देण्यात आली.
प्रथम त्यांना यावर विश्वास बसला नाही, मात्र, डॉ. भडके यांनी त्यांचा विश्वास संपादन करून या कार्य्रमाचे यशस्वी आयोजन केले. गावातील ज्या गायी-म्हशी गरोदर आहेत, अशा पशुधनांना पशुपालकांनी कार्यक्रमात आणले. तिथे सर्वांची पुजाअर्चा करण्यात आली.
यावेळी गरोदर गायी-म्हशी यांना देण्यासाठी पशुपालकांना खनिजमिश्रण, जंतनाशक गोळी व भेटवस्तू देण्यात आली. यावेळी सरपंच प्रभाकर बोदेले, नत्थू बांते, धनराज शेंदरे, नरेंद्र मेश्राम, राहुल खोब्रागडे, भाग्यवंत लांजेवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. पशुधनांचा सातवा महिना कार्यक्रम राबविण्याचा हा कदाचित देशातील पहिलाच उपक्रम ठरला.

सातव्या महिन्यामागे वैज्ञानिक कारण
पुरातन काळापासून महिलांचा सातवा महिना साजरा करण्याची परंपरा आहे. यामागे काही वैज्ञानिक कारणे आहेत. सात महिन्यांपर्यंत आईच्या गर्भात बाळाची वाढ ६० टक्केपर्यंत होते. शेवटच्या तीन महिन्यात चांगली वाढ व्हावी याकरिता विशेष पोषणयुक्त आहार देण्यात येते. शरीरातील हिमोग्लोबिन व प्रथिनांचे प्रमाण कमी होऊन आई व बाळ यांची प्रकृती धोक्यात येऊ नये, हे या मागील मुख्य कारण आहे. सातवा महिन्यानंतर गरोदर मातेला मार्गदर्शन व सकस आहाराचे सेवन करण्याचा सल्ला देण्यात येते. हेच कारण पशुधनांच्या बाबतीत तंतोतंत लागू होतात.

सातव्या महिन्यांपासून गायी-म्हशींचे दूध काढणे बंद होते. त्यामुळे दूध नाही तर पशुखाद्य नाही, अशी पशुपालकांची धारणा होते. मात्र, सातव्या महिन्यांपासून गरोदर पशुधनाला पोषक पशुखाद्य मिळायला पाहिजे. तरच दुधाची झीज भरून निघते. बाळाची वाढ चांगली होते, गर्भारपणात बाळ सुदृढ राहते. प्रसुतीदरम्यान बाळ अडणे, जार न पडणे या आजारापासून मुक्ती होते. या सर्व बाबींची माहिती पशुपालकांना व्हावी व पशुधनांचा सातवा महिना कार्यक्रम राबवावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले.
- डॉ. गुणवंत भडके,
पशुधन विकास अधिकारी, पशुवैद्यकीय दवाखाना, मानेगावं.

Web Title: 69 'The seventh month' of the cattle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.