संस्थेत ६.६७ लाखांचा गैरव्यवहार!
By Admin | Updated: October 17, 2016 00:29 IST2016-10-17T00:29:45+5:302016-10-17T00:29:45+5:30
विविध कार्यकारी सेवा संस्थांतर्गत चार नोंदणीकृत संस्थेमध्ये ६.६७ लाखांची अफरातफर केल्याचे प्रकरण उघडकीला आले आहे.

संस्थेत ६.६७ लाखांचा गैरव्यवहार!
गटसचिवाविरुध्द गुन्हा दाखल : साकोली तालुक्यातील विविध कार्यकारी संस्था
भंडारा : विविध कार्यकारी सेवा संस्थांतर्गत चार नोंदणीकृत संस्थेमध्ये ६.६७ लाखांची अफरातफर केल्याचे प्रकरण उघडकीला आले आहे. याप्रकरणी जिल्हा विशेष लेखा परिक्षक व निबंधक सहकारी संस्था यांच्या लेखी तक्रारीवरुन गटसचिव उमेश सदाशिव लंजे याच्या विरुध्द साकोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मागील पाच वर्षांपासून गाजत असलेल्या या प्रकरणात कारवाई व्हावी यासाठी चौकशी सुरु होती. याअंतर्गत विविध कार्यकारी सेवा संस्था अंतर्गत सरकारी संस्थांमधील पैशाची अफरातफर केल्याचे म्हटले जात होते. यासंदर्भात १ एप्रिल २०११ ते ३१ मार्च २०१२ या कालावधीत गटसचिव पदावर असलेल्या उमेश लंजे यांनी सरकारी संस्थांतर्गत येत असलेल्या रेंगेपार, सातलवाडा, मोखे व किन्ही येथील विविध कार्यकारी सेवा संस्थांमध्ये उपरोक्त रकमेची अफरातफर केली. नियमाला डावलून हेतुपुरस्सर विश्वासघात केल्याचे चौकशीअंती स्पष्ट झाले.
या संदर्भात चारही संस्थामध्ये झालेल्या गैरव्यवहाराची वा अफरातफरीची लेखी तक्रार सहायक निबंधक सहकारी संस्था साकोली व जिल्हा विशेष लेखा परिक्षक वर्ग १ सहकारी संस्था भंडारा यांच्याकडे रामभाऊ कारेमोरे रा. साकोली यांनी केली होती. या अनुषंगाने तपास सुरु होता. तपासाअंती व सहकारी संस्थेच्या अहवालावरुन उमेश लंजे याने चारही संस्थांमधून ६ लक्ष ६७ हजार ४९५ रुपयांची अफरातफर केल्याची लेखी तक्रार साकोली पोलीस ठाण्यात करण्यात आली. यामध्ये रेंगेपार संस्थेतून १ लक्ष १३ हजार २६० रूपये, सातलवाडा येथील संस्थेतून २ लक्ष ५२ हजार ८५८ रूपये, किन्ही यथील संस्थेतून २ लक्ष ५६ हजार ८६८ तर मोखे येथील संस्थेतून ४४ हजार ५०९ रूपयांची अफरातफर केल्याचे उघडकीला आले आहे.
तक्रारीहून साकोली पोलिसांनी भांदविच्या ४०९ कलमान्वये उमेश लंजे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात तपासी अधिकारी एपीआय गावंडे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. याप्रकरणात अजून कोणते मासे गळाला लागतात याकडे तालुकावासींयाचे लक्ष लागले आहे. या संपूर्ण घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक जी. के. गावंडे करीत आहेत. (प्रतिनिधी)