६६ लाखांची योजना कुचकामी
By Admin | Updated: March 2, 2016 01:24 IST2016-03-02T01:24:49+5:302016-03-02T01:24:49+5:30
विरली (बु.) येथील पाणी पुरवठा योजनेद्वारे नागरिकांना पुरविण्यात येणारे पाणी गढूळ असून पिण्यायोग्य नाही.

६६ लाखांची योजना कुचकामी
चार दिवसांनी पाणी मिळाले : विरली येथे गढूळ पाण्याचा पुरवठा
विरली (बु.) : विरली (बु.) येथील पाणी पुरवठा योजनेद्वारे नागरिकांना पुरविण्यात येणारे पाणी गढूळ असून पिण्यायोग्य नाही. मागील ३ दिवसापासून येथील पाणी पुरवठा यंत्रणेमध्ये दोष निर्माण झाला असून पाणी पुरवठा अनियमित झाला आहे. चार दिवसानंतर नागरिकांना नेहमीप्रमाणे भरपूर पाणी मिळाले. परंतु त्याची गुणवत्ता मात्र नेहमीप्रमाणे नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे सुमारे १५ वर्षापूर्वी पाणी पुरवठ्यासाठी जलकुंभ आणि जलवाहिनी उभारण्यात आली आहे. त्याच्या वितरणामध्ये बिघाड असल्यान पाणी पुरवठा नियमितपणे होत नव्हता. या योजनेतील स्त्रोत नादुरुस्त झाल्यामुळे शिवकालीन पाणी साठवण योजनेच्या साठवण विहिरीतून पाणी घेण्यात येत आहे. ही योजना पुरेशी असताना राज्यकर्ते आणि ठेकेदारांनी संगनमत करून वैनगंगा नदीवरून पाणी आणण्याची योजना प्रस्तावित करण्यात आली. या योजनेचे काम पूर्ण झाले असून त्याद्वारे अजूनपर्यंत पाणी मिळाले नाही.
मागील तीन वर्षाआधी या योजनेच्या नेतृत्वाची संधी मिळावी यासाठी दोन नेत्यांनी ग्रामसभेच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन केले. परंतु विक्रमी उपस्थिती असूनही या ग्रामसभामध्ये नेतृत्व बदलाचा निर्णय झाला नाही. आज ही योजना पूर्ण होऊन लोकार्पणाची वाट पाहत आहे. परंतु गावकऱ्यांना शुद्ध, स्वच्छ आणि गुणवत्तापूर्ण पाणी देण्यासाठी असमर्थ ठरली आहे. (वार्ताहर)