६३ लाखांचे चुकारे थकीत

By Admin | Updated: January 7, 2016 00:58 IST2016-01-07T00:58:03+5:302016-01-07T00:58:03+5:30

करडी धान खरेदी केंद्रावर जय किसान बहुउद्देशिय सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था करडी मार्फत धान खरेदी सुरु करण्यात आली.

63 lakh rupees exhausted | ६३ लाखांचे चुकारे थकीत

६३ लाखांचे चुकारे थकीत

खरेदी बंद : करडी धान खरेदी केंद्रावरील प्रकार
युवराज गोमासे करडी (पालोरा)
करडी धान खरेदी केंद्रावर जय किसान बहुउद्देशिय सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था करडी मार्फत धान खरेदी सुरु करण्यात आली. २ डिसेंबर २०१५ रोजी सुरु झालेल्या केंद्रावर आतापर्यंत ४४७५.८५ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. केंद्र सुरु होवून एक महिन्याचा कालावधी लोटत असताना अजूनपर्यंत ६६ लाख, १० हजार ९४८.५० रुपयांचे चुकारे मिळालेले नाहीत.
थकीत चुकाऱ्यांसाठी शेतकरी केंद्राच्या चकरा काढीत असून गोडावून पूर्ण भरल्याने सध्या खरेदी बंद आहे. करडी येथील ग्रामपंचायतच्या कृषी गोडावून मध्ये शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. सदर केंद्र करडी येथील जयकिसान बहुउद्देशिय सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थेला धान खरेदीसाठी देण्यात आले. या संस्थेमार्फत परिसरातील धानाची खरेदी शासकीय आधारभूत दरात केली जात आहे. धान खरेदी केंद्राचे उद्घाटन दिवाळी अगोदर करण्यात आले. मात्र प्रत्यक्ष खरेदी २ डिसेंबरपासून करण्यात आली.
२ डिसेंबर ते २ जानेवारी १०१६ पर्यंत केंद्रावर ४४७५.८५ क्विंटल धानाची खरेदी प्रती क्विंटल १४१० या शासकीय दरात करण्यत आली. एकुण ६६ लक्ष १०हजार ९४८ रुपयांच्या धानाची खरेदी करण्यात आली. मात्र अद्याप चुकारे शेतकऱ्ळांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. आज उद्या चुकारे दिले जातील, असे सांगितले जात असल्याने शेतकरी बंद केंद्राच्या चकरा मारीत आहेत. परंतु केंद्रावर कोणीही मिळत नसल्याने त्यांना आल्या पावली परतावे लागत आहे.
करडी केंद्राचे गोडावून भरल्याचे कारण देत केंद्र बंद करण्यात आले. केंद्रावर शेतकरी वर्गाने आणलेल्या धान्य परत न्यावा लागला. त्याचा अतिरिक्त खर्च (वाहतूक, हमाली आदी) शेतकऱ्यांच्या माथी बसला. गोडावून मधील धान्याची उचल झाल्यानंतर केंद्र सुरु होतील, असे सांगितले जात आहेत. मात्र केव्हा मालाची उचल होणार? केव्हा केंद्र सुरु होणार? केव्हा शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे चुकारे मिळणार? आदी प्रश्नांची माहिती कोणीही देण्यास तयार नाहीत. चकरा मारून थकलेला शेतकरी केंद्रावर धानाची विक्री करून फसल्याची भावना व्यक्त करीत आहे. राज्य शासनाने केंद्र सुरु करताना वेळेवर व खरेदीच्या ८ दिवसात शेतकऱ्यांचे चुकारे दिले जातील, असे आश्वास दिले होते. ते आश्वासन फोल ठरले आहे. लोकप्रतिनिधींनी सुद्धा उद्घाटन प्रसंगी दिलेल्या शब्दांना आता अर्थ उरला नसल्यांचे, दिशाभूल केली जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहेत.
करडी येथील धान खरेदी केंद्र परिपूर्ण भरलेला आहे. त्यामुळे खरेदी बंद आहे. गोडावून रिकामे झाल्यानंतर केंद्र पुन्हा सुरु केले जातील. चुकाऱ्यांची मागणी करण्यात आलेली आहे. चुकाऱ्यांचे वाटप प्रत्यक्ष त्यांच्या खात्यावर केले जाईल. खरेदी बंद करण्यात आली आहे, असे संस्थेचे अध्यक्ष शरद तितीरमारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title: 63 lakh rupees exhausted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.