६० हजार विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव गणवेशाविना

By Admin | Updated: June 29, 2017 00:35 IST2017-06-29T00:35:53+5:302017-06-29T00:35:53+5:30

जिल्हा परिषद शाळांचा प्रवेशोत्सव करताना विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व गणवेशाचे वाटप करण्याचा अध्यादेश आहे.

60 thousand students without admission | ६० हजार विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव गणवेशाविना

६० हजार विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव गणवेशाविना

अनुदान अप्राप्त : विद्यार्थी व पालकांचा हिरमोड, शिक्षण विभागाची अनास्था ठरली कारणीभूत
प्रशांत देसाई। लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्हा परिषद शाळांचा प्रवेशोत्सव करताना विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व गणवेशाचे वाटप करण्याचा अध्यादेश आहे. प्रवेशोत्सव हा आनंदोत्सवात साजरा करण्याचे निर्देश असतानाही जिल्ह्यातील सुमारे ६० हजार विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहिले. शासनाकडून प्राप्त होणारे अनुदान न मिळाल्याने विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव जुन्याच गणवेशावर करण्यात आला. यामुळे विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला.
जिल्ह्यात ७६७ जिल्हा परिषद शाळा तर ३२ जिल्हा परिषद हायस्कुलचा समावेश आहे. या शाळांमधून ५७ हजार ४५५ विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे. इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांकरिता राज्य शासनाच्या शिक्षण विभागाच्या सर्व शिक्षा अभियांतर्गत विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तक व गणवेश वितरण करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदांवर सोपविण्यात आली होती. मात्र यावर्षीच्या शैक्षणिक सत्राच्या पूर्वी सर्व विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यात आला. परंतु विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी ‘छदाम’ही देण्यात आला नाही.
इयत्ता पहिली ते आठवीच्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दारिद्र्य रेषेखालील पालकांचे पाल्य व सर्व प्रवर्गातील मुलींना गणवेशाचा लाभ देण्याची तरतूद शासनाने केली. यात वर्षभराकरिता एका विद्यार्थ्याला दोन गणवेश देण्याचे निर्देश आहेत. याकरिता एका विद्यार्थ्याच्या एका गणवेशावर २०० रूपये याप्रमाणे दोन गणवेशाकरिता ४०० रूपये विद्यार्थ्यांना देण्याचे नियोजित होते. ही तरतूद शाळा सुरू होण्यापूर्वीची होती. या प्राप्त निधीतून विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू होण्यापूर्वी गणवेश शिवणे व प्रवेशोत्सवाच्या दिवशी तो परिधान करून शाळेची सुरुवात गणवेशाने करायची अशी अंमलबजावणी करायची होती. मात्र राज्य शिक्षण विभागाच्या तकलादू भूमिकेमुळे जिल्हा परिषद शिक्षण विभागाला या निधीतून एक रूपयाही प्राप्त झालेला नाही. त्यामुळे प्रवेशोत्सवादरम्यान आनंदोत्सवा ऐवजी हिरमोड दिसून आला. आनंददायी वातावरण व स्वच्छता ठेवणे असा यामागील उद्देश शिक्षण विभागाने ठेवला होता. मात्र अनुदान अप्राप्त असल्याने विद्यार्थ्यांना नवीन गणवेश शिवता न आल्याने जुन्याच कपड्यांना स्वच्छ धुवून तो परिधान करावा लागल्याची नामुष्की यावर्षी जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये बघायला मिळाली.

बँक खाते ठरले डोकेदुखी
विद्यार्थी व त्याच्या आईचे संयुक्त रित्या राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडल्यानंतर त्या खात्यात गणवेशाची रक्कम जमा होणार आहे. सध्यास्थितीत केवळ १८ टक्केच विद्यार्थ्यांची बँक खाती उघडण्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. सध्या शेतीचा हंगाम सुरु असल्याने मिळणारी रोजी सोडून बँकेत ताटकळत उभे राहावे लागणे पालकांना परवडणारे नाही आणि गणवेशाच्या केवळ ४०० रुपयांसाठी ५०० रुपये दिवसाची रोजी बुडविण्याचा हा प्रकार असल्याची ओरड आहे.

बँकांचेही भाव वधारले
राष्ट्रीयकृत बँकेतच हे खाते उघडायचे आहेत. काही बँकांनी सुरुवातीला १०० रुपये अनामत रकमेवर विद्यार्थ्यांची खाती उघडली. मात्र आता बँकांनी त्यांच्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल बघता ५०० रुपये केली व त्यानंतर आता ती १००० रुपयावर नेऊन ठेवली आहे. म्हणजेच दोन गणवेशाकरिता विद्यार्थ्याला मिळणार ४०० रुपये व बँकेत खाते उघडायला गुंतवावे लागणार १००० रुपये, असा अनाहूत प्रकार जिल्ह्यातील अनेक राष्ट्रीयकृत बँकांमध्ये बघायला मिळत आहे.

नवीन नियमाने झाली धावपळ
यावर्षी गणवेशाची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केल्यानंतर त्याची खरेदी करायचा निर्णय शासनाने घेतला. मागील वर्षी विद्यार्थ्यांना गणवेश शाळेतूनच प्राप्त होत होते. या नवीन नियमामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षक यांची धावपळ सुरु आहे. शाळेतून गणवेशाचा कापड दिल्या जात असताना योग्य पद्धतीचा तो खरेदी करून वितरीत करण्यात येत होता. किंवा एखाद्याला त्याचे कंत्राट देऊन विद्यार्थ्यांना वेळेत गणवेश मिळाले होते. मात्र या नवीन नियमाने सर्वांचीच धावपळ सुरु केली आहे.

शिक्षण विभागाकडून पाठ्यपुस्तके प्राप्त झाली आहेत. मात्र गणवेशाची रक्कम अद्यापही अप्राप्त आहे. १८ टक्के विद्यार्थ्यांचे खाते उघडण्यात आली आहेत.
-मोहन चोले,
उपशिक्षणाधिकारी, भंडारा.

Web Title: 60 thousand students without admission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.