५३ हजार बालकांना आधारची प्रतीक्षा
By Admin | Updated: May 1, 2015 00:46 IST2015-05-01T00:46:56+5:302015-05-01T00:46:56+5:30
शून्य ते पाच वयोगटातील बालकांचे आधार कार्ड काढण्याची मोहीम मार्च महिन्यांपासून हाती घेण्यात आली आहे.

५३ हजार बालकांना आधारची प्रतीक्षा
देवानंद नंदेश्वर भंडारा
शून्य ते पाच वयोगटातील बालकांचे आधार कार्ड काढण्याची मोहीम मार्च महिन्यांपासून हाती घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील ८५ हजार ५५४ बालकांपैकी सुमारे ३२ हजार ५३९ बालकांचे आधार कार्ड काढण्यात आले. अद्यापही ५३ हजार १५ बालकांना आधार नोंदणीची प्रतीक्षा आहे.
शासकीय योजनांमधील गैरव्यवहार कमी करून पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने प्रत्येक नागरिकाला आधार कार्ड देण्याची मोहीम केंद्र शासनाने सुरू केली आहे. शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आधार कार्ड सक्तीचे केल्याने नागरिकही स्वत:हून आधार कार्ड काढत आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार भंडारा जिल्ह्याची लोकसंख्या जवळपास १२ लाख एवढी आहे. त्यापैकी ८९ टक्के नागरिकांचे आधार कार्ड काढण्यात आले आहेत. नागरिकांचे आधार कार्ड काढण्याचे काम अंतिम टप्प्यात आल्यानंतर शासनाने ० ते पाच या वयोगटातील अंगणवाडीमध्ये शिकणाऱ्या बालकांचे आधार कार्ड काढण्याची मोहीम मार्च महिन्यांपासून सुरू केली आहे. सद्य:स्थितीत ग्रामीण भागातील आधार केंद्रांवर २९ यंत्र सुरू आहेत. त्यापैकी एक यंत्र बंद असल्याने २८ मशीनवर कामे केली जात आहेत. जिल्हाभरात ० ते पाच या वयोगटातील ८५ हजार ५५४ बालके आहे. त्यापैकी आजपर्यंत ३२ हजार ५३९ बालकांचे आधार कार्ड काढण्यात आले आहेत. संपूर्ण बालकांचे जून महिन्यापर्यंत आधार कार्ड काढण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र १00 टक्के उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी जास्त कालावधी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
अंगणवाडीतील बालकांचेही आधार कार्ड काढण्याची मोहीम हाती घेतली आहे. महिला व बालकल्याण विभागाने दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. रोहयो मजुरांचे जॉब कार्ड काढण्याची प्रक्रीयाही अद्यापही सुरु आहे. त्यामुळे आतापर्यत केवळ ३८ टक्के बालकांची आधार कार्ड काढण्यात आले. लवकरच उर्वरीत बालकांचे आधार कार्ड काढण्यात येतील.
- प्रतापसिंग राठोड,
उपमुख्य कार्यपालन अधिकारी (महिला व बालकल्याण विभाग)
आधार कार्ड काढण्याची मोहीम ग्रामीण भागात सुरू झाली आहे. ग्रामीण भागातील अनेक नागरिकांचे आधार कार्ड काढण्यात आले नाही. परिणामी त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेताना अडचण निर्माण होत आहे. ही बाब लक्षात घेऊन ज्या गावी आधार केंद्र स्थापन करण्यात आले आहे. त्या गावातील बालकांसोबतच इतरही नागरिकांचे आधार कार्ड काढण्यात येत आहेत. मात्र यामध्ये प्रथम प्राधान्य बालकांनाच दिला जात आहे. प्रशासनाच्या या उपक्रमाची नागरिकांनी प्रशंसा केली आहे.
विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढण्याबद्दल निर्देश नाही
अंगणवाडीतील बालकांसोबतच पहिली ते दहाव्या वर्गापर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढावे लागणार आहेत. प्रवेश घेण्यासाठी प्रत्येक बालकाला आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये प्रकाशित होत आहेत. मात्र याबद्दल कोणतेही अधिकृत पत्र महिला बालकल्याण विभागाला प्राप्त झाले नाही.