जिल्ह्यात ५३ उमेदवार रिंगणात

By Admin | Updated: October 1, 2014 23:17 IST2014-10-01T23:17:09+5:302014-10-01T23:17:09+5:30

‘युती तुटली आणि आघाडी बिघडली’ यामुळे सर्वच राजकीय पक्षांना निवडणूक लढण्याची संधी मिळाली. उमेदवारी न मिळाल्यामुळे अनेकांवर माघारीची वेळ आली. काहींना निवडणूक न लढविलेली

53 candidates in the district | जिल्ह्यात ५३ उमेदवार रिंगणात

जिल्ह्यात ५३ उमेदवार रिंगणात

भंडारा : ‘युती तुटली आणि आघाडी बिघडली’ यामुळे सर्वच राजकीय पक्षांना निवडणूक लढण्याची संधी मिळाली. उमेदवारी न मिळाल्यामुळे अनेकांवर माघारीची वेळ आली. काहींना निवडणूक न लढविलेली बरी असे वाटले, तर काही स्वयंभू नेत्यांनी राजकीय महत्वाकांक्षेपोटी उमेदवारी कायम ठेवली आहे. काहींना शांत करण्यात पक्षश्रेष्ठीला यश आले तर काहींनी निवडणूक लढण्याचे बंड थोपटले आहे. त्यामुळे राजकीय पक्षाच्या उमेदवारांना बंडोबांचा काहीसा सामना करावा लागणार आहे. भंडारा जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. या तिन्ही विधानसभा क्षेत्रात प्रमुख राजकीय पक्षात लक्षत रंगणार आहे. भंडारा क्षेत्रात शिवसेना, बसपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपात चौकोनी, तुमसर क्षेत्रात भाजपा, शिवसेना, काँग्रेसमध्ये तर साकोली क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि भाजपात लढत होण्याची शक्यता आहे. मतदानाला १५ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. जिल्ह्यात एकाही पक्षाच्या एकाही मोठ्या नेत्यांची प्रचारसभा अद्याप झालेली नाही. राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल पटेल हे मात्र जिल्ह्यातील तिन्ही क्षेत्रात कार्यकर्ता मेळावा घेऊन कार्यकर्त्याशी संवाद साधला. (जिल्हा प्रतिनिधी)
भंडारा : तुमसर विधानसभा क्षेत्रात एकूण १९ उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते. त्यापैकी छाननीत २ नामांकन अवैध ठरले. त्यानंतर १७ उमेदवारांपैकी ४ उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता १३ उमेदवार रिंगणात कायम आहेत. यात भाजपने उमेदवारी नाकारल्यामुळे मधुकर कुकडे हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून तर किसान गर्जना संघटनेचे राजेंद्र पटले हे शिवसेनेकडून लढत आहेत. काँग्रेसने प्रमोद तितीरमारे यांना तर भाजपाने चरण वाघमारे यांना रिंगणात उतरविले आहे. या क्षेत्रात भाजपने उमेदवारी नाकारल्यामुळे तेथील दावेदारांनी अन्य पक्षात धाव घेतली. निष्ठावंतांचा फटका भाजपला बसणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने कुणबी समाजाला, भाजपाने तेली समाजाला तर सेनेने पोवार समाजाला जवळ केले आहे. त्यामुळे प्रत्येकच उमेदवार ताकदीने कामाला लागला आहे.
भंडारा : अनुसूचित प्रवर्गासाठी राखीव असलेल्या भंडारा विधानसभा क्षेत्रात एकूण ४९ उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते. त्यापैकी छाननीत १३ नामांकन अवैध ठरले. त्यानंतर ३६ उमेदवारांपैकी १७ उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता १९ उमेदवार रिंगणात आहेत. यात शिवसेनेचे नरेंद्र भोंडेकर आणि बहुजन समाज पार्टीने देवांगणा विजय गाढवे यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेने कार्यकर्त्यांची भक्कम फळी उभारली आहे. बसपाकडून सामाजिक बांधणी सुरू आहे. काँग्रेस आणि राकाँच्या उमेदवारीसाठी अनेकांनी प्रयत्न केले. त्यामुळे असंतुष्ठांनी बंड पुकारत उमेदवारी दाखल केली होती. काहींना शांत करण्यात आले असले तरी काँग्रेस आणि राकाँमध्ये आतून कुरघोडी होण्याची शक्यता बळावली आहे. राकाँने सच्चिदानंद फुलेकर यांना भाजपने रामचंद्र अवसरे यांना तर काँग्रेसने युवराज वासनिक यांना रिंगणात उतरविले आहे.
भंडारा : साकोली विधानसभा क्षेत्रात एकूण ४२ उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते. त्यापैकी छाननीत १ नामांकन अवैध ठरला. मंगळवारला दोन उमेदवारांनी नामांकन मागे घेतले तर शेवटच्या दिवशी १८ उमेदवारांनी असे २० उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता २१ उमेदवार रिंगणात कायम आहेत. साकोली क्षेत्र कुणबीबहुल आहे. याच समाजाची मते अधिक असल्यामुळे सर्वच प्रमुख पक्षाने यावर भर दिला आहे. भाजपच्या उमेदवारीसाठी अनेकांनी दिल्ली व मुंबईच्या वाऱ्या केल्या होत्या. परंतु उमेदवारी नाकारल्यामुळे या पक्षात प्रचंड धुसफुस सुरु आहे. सामाजिक बांधणीवर भर दिलेल्या राकाँने सुनिल फुंडे यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने सेवक वाघाये यांना, भाजपाने राजेश काशीवार यांना तर सेनेने प्रशांत पडोळे यांना रिंगणात उतरविले आहे. विजयासाठी लाखांदूर तालुका महत्त्वाचा ठरणार आहे.

Web Title: 53 candidates in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.