दोन जागांसाठी ५१ दावेदार
By Admin | Updated: August 9, 2014 00:46 IST2014-08-09T00:46:44+5:302014-08-09T00:46:44+5:30
जिल्ह्यातील तीन विधानसभा क्षेत्रासाठी भाजपच्या निरीक्षकांनी गुरुवारला इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या.

दोन जागांसाठी ५१ दावेदार
भंडारा : जिल्ह्यातील तीन विधानसभा क्षेत्रासाठी भाजपच्या निरीक्षकांनी गुरुवारला इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. तब्बल ६२ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदारपदाच्या उमेदवारीवर दावा केला आहे. साकोली विधानसभा क्षेत्रातून सर्वाधिक ३० कार्यकर्त्यांनी निवडणूक लढण्यासाठी मुलाखती दिल्या आहेत.
उमेदवारीसाठी भाजपने इच्छुकांना प्रस्ताव सादर करण्याची संधी दिली आहे. यापूर्वी सर्व्हेक्षणातून निवड केली जात होती. पक्षात पहिल्यांदाच खुल्या पद्धतीने उमेदवारीसाठी प्रस्ताव मागविण्यात आल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता. आपआपल्या समर्थकांसह इच्छूक दावेदार सकाळपासूनच मुलाखतस्थळी दाखल झाले होते.
मुलाखतीसाठी निरीक्षक म्हणून भाजपचे प्रदेश सरचिटणीस आ.राम शिंदे, किसान आघाडीचे अध्यक्ष ज्ञानबाजी मुंढे हे भंडाऱ्यात आले होते.
सकाळी ११ वाजतापासून कार्यकर्त्यांचे अर्ज स्वीकारुन मुलाखती घेण्यासाठी सुरुवात झाली. यात साकोली क्षेत्रासाठी ३० इच्छुकांनी, तुमसर क्षेत्रासाठी २१ तर भंडारा क्षेत्रासाठी ११ इच्छुकांनी निरिक्षकांसमोर मुलाखती दिल्या.
दरम्यान, शुक्रवारला विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत आ.शिंदे म्हणाले, राज्यातील ३६ जिल्ह्यातील इच्छूक दावेदारांच्या मुलाखती घेण्याचा कार्यक्रम प्रदेश भाजपने आखला आहे. त्यानुसार मुलाखतीच्या माध्यमातून संघटनात्मक आढावा घेणे, सध्याची त्या-त्या मतदार संघातील स्थितीसह संघटनेच्या बाबींवर कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात आली.
भंडारा जिल्ह्यात तीन विधानसभा मतदार क्षेत्र असून साकोलीतून ३०, तुमसरातून २१ आणि भंडारा शिवसेनेकडे असतानाही ११ इच्छुकांनी मुलाखती दिल्याचे सांगून म्हणाले, भंडारा जिल्ह्याचा हा अहवाल सोमवारपर्यंत प्रदेश कार्यकारिणीकडे सादर करण्यात येणार असून १५ आॅगस्टपर्यंत पहिली यादी जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुलाखती घेतलेल्या दावेदारांमधूनच उमेदवारी देणार का? या प्रश्नावर ज्यांनी मुलाखती दिलेल्या आहेत, त्यांच्यापैकीच उमेदवारी दिली जाणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)