औषध कारखान्यात ५० टन लाकडे जप्त

By Admin | Updated: January 13, 2015 22:54 IST2015-01-13T22:54:16+5:302015-01-13T22:54:16+5:30

विना परवानगी अवैध वाहतूक करणाऱ्या दोन चारचाकी वाहनांना वनअधिकाऱ्यांनी सापळा रचून पकडले. ही लाकडे देव्हाडी येथील क्लेरियन ड्रग कंपनीत बॉयलर प्रज्वलनाकरिता

50 tons of wood seized in the drug factory | औषध कारखान्यात ५० टन लाकडे जप्त

औषध कारखान्यात ५० टन लाकडे जप्त

बॉयलर प्रज्वलनाकरिता उपयोग : तुमसर वन विभागाची कंत्राटदारावर कारवाई
तुमसर : विना परवानगी अवैध वाहतूक करणाऱ्या दोन चारचाकी वाहनांना वनअधिकाऱ्यांनी सापळा रचून पकडले. ही लाकडे देव्हाडी येथील क्लेरियन ड्रग कंपनीत बॉयलर प्रज्वलनाकरिता उपयोगात आणली जात होती. ५० टन लाकडांचे ठोकडे वनअधिकाऱ्यांनी जप्त केली. या प्रकरणात लाकूड कंत्राटदारावर कारवाई करण्यात आली.
कंपनी व्यवस्थापकांचे बयाण नोंदविण्यात आले. या लाकडांची किंमत दीड लाखाच्या वर आहे. तुमसर वनविभागाला गुप्त माहितीच्या आधारावर अवैध लाकडे वाहून नेणाऱ्या वाहनाबाबद माहिती प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने वनअधिकाऱ्यांच्या पथकाने सापळा रचला. तुमसर हद्दीत २ जानेवारी रोजी देव्हाडी शिवारात एका धर्मकाट्यावर पीकअप गाडी क्रमांक एम.एच.१५ डीके ३३११ वजन करतांनी पकडली. वनअधिकाऱ्यांनी लाकूड वाहतुकीचा परवाना लाकडे कुठून आणली त्याचा पुरावा (टिपी) कागदपत्रे सादर करण्यास सांगितली. तेव्हा चालकांची तारांबळ उडाली. वनअधिकाऱ्यांनी हे वाहन तुमसर वनकार्यालयात जमा केले.
३ जानेवारीला पुन्हा संबंधित लाकूड कंत्राटदाराच्या दुसऱ्या वाहनाची माहिती प्राप्त झाली. हे वाहन बोरी गावाजवळ आडमार्गाने वेगाने जाताना अधिकाऱ्यांनी रोखले. पीक अप व्हॅन क्रमांक एम.एच. १५ डीके ७९०६ रंगेहात पकडले. या दोन्ही वाहनात लाकूड कंत्राटदार रामेश्वर गंगाराम मोटघरे (३०) रा.चुल्हाड यांची लाकडे होती. कंत्राटदार मोटघरे याने बयाणात देव्हाडी येथील क्लेरियन ड्रग कंपनीला लाकडांचे ठोकडे विक्री केल्याची कबुली दिली. विना परवानगीने अवैध लाकूड वाहतूक केल्याबाबत भारतीय वनअधिनियम १९२७ कलम ४१ अंतर्गत कारवाई करण्यात आली. कंपनी व्यवस्थापक त्रिलोकी सिंह यांनी आपल्या बयाणात रामेश्वर मोटघरे यांच्याकडून लाकडे खरेदी केली. त्याचे रितसर बिल त्याने दिले होते. लाकडे कुठून आणले याबद्दल आम्हाला माहिती नव्हती असे बयाणात सांगितले.
चुल्हाड परिसरातील शेतावरील लाकडे येथे कापण्यात आली होती. त्या लाकडांना सिहोरा येथील ओंकार आरा मशीनवर लाकडाचे तुकडे करण्यात आले. त्या आरा मशीनवरही कारवाई करण्यात येईल असे वनअधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
यात हिवर, पळस, कडू लिंब, मोह, बाभूळ, साजा, किन्ही या लाकडांचा समावेश आहे. सदर कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी एस.यु. मडावी यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहाय्यक बी.डी. चोपकर, गस्ती पथकाचे वनपाल एन.के. तलमले, बीट रक्षक ए.डी. राऊत यांनी केली. सहाय्यक वनसंरक्षक डी.जी. लुटे यांनी दि. २ जानेवारी रोजी भेट देऊन लाकडांचा पंचनामा करण्याचे निर्देश दिले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: 50 tons of wood seized in the drug factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.