शहरात ५० फुटांची गुढी उभारणार
By Admin | Updated: March 21, 2015 01:21 IST2015-03-21T01:21:31+5:302015-03-21T01:21:31+5:30
श्रीराम शोभायात्रा समितीच्यावतीने गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे

शहरात ५० फुटांची गुढी उभारणार
पत्रपरिषद : उत्सवाला सहकार्याचे शोभायात्रा समितीचे आवाहन
भंडारा : श्रीराम शोभायात्रा समितीच्यावतीने गुढीपाडवा ते रामनवमीपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. हा उत्सव शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पाडावा. यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष सुनिल मेंढे यांनी आयोजित पत्रपरिषदेत केले.
२१ मार्च रोजी गुढीपाडव्यानिमित्त शहरातील प्रमुख पाच चौकांमध्ये गुढी उभारली जाणार आहे. येथील गांधी चौकात ५० फुट उंचीची गुढी सकाळी ७ वाजता उभारल्यानंतर नववर्षाचे स्वागत करण्यासाठी शहरातून दुचाकी रॅली काढण्यात येईल. त्या चौकांमध्ये रामायणावर आधारित पथनाट्य सादर करणार आहेत. संस्कार भारतीच्या वतीने १५० फूट लांब कॅनव्हासवर चित्र काढण्याची स्पर्धा घेतली जाणार आहे. या चित्रांचे प्रदर्शन आगामी आठ दिवस त्या ठिकाणी राहणार आहे.
२२ रोजी बहिरंगेश्वर मंदिरातून लहान मुलांसाठी रामायणावर आधारित वेशभूषा स्पर्धा, २३ रोजी भजनसंध्या कार्यक्रम होईल. २४ रोजी श्रीगणेश शाळेत भजनसंध्येचा कार्यक्रम होईल. २५ ते २७ मार्च दरम्यान रात्री ८ वाजता वाल्मिकी रामायणावर आधारित रामकथा भागवताचार्य बा. ल. चोथवे सादर करणार आहेत.
२७ मार्च रोजी सकाळी हृदयरोग व मेंदूच्या आजारांचे मोफत तपासणी शिबिर बहिरंगेश्वर मंदिरात घेतले जाईल. २८ मार्च रोजी राम जन्मोत्सव दुपारी १२ वाजता होईल. संध्याकाळी ६ वाजता श्रीरामाची शोभायात्रा जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते रथाची पूजा करून शोभायात्रेला प्रारंभ होईल.
या शोभायात्रेमध्ये सहभागी चित्ररथांची स्पर्धा घेतली जाणार असून आकर्षक चित्ररथांना बक्षिसे दिले जाणार आहेत. यावर्षीचा रामजन्मोत्सव वैविध्यपूर्ण व्हावा आणि पार पडावा, अशी अपेक्षाही समितीचे अध्यक्ष सुनिल मेंढे यांनी केली. यावेळी समितीचे सचिव बाळा आंबेकर, सतीश सार्वे व धनंजय ढगे उपस्थित होते. (प्रतिनिधी)