डेंग्यू निर्मूलनासाठी ४८ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

By Admin | Updated: August 29, 2016 00:22 IST2016-08-29T00:22:31+5:302016-08-29T00:22:31+5:30

राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात जिल्हा हिवताप कार्यालयाच्या वतीने डेंग्यू निर्मूलनासाठी जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.

48 thousand students participate in the eradication of dengue | डेंग्यू निर्मूलनासाठी ४८ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

डेंग्यू निर्मूलनासाठी ४८ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

भंडारा : राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात जिल्हा हिवताप कार्यालयाच्या वतीने डेंग्यू निर्मूलनासाठी जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील १९७ शाळांमधील ४८ हजार विद्यार्थी शालेय डेंग्यू शोध मोहीमेत सहभागी झाले आहेत. 
मागील दोन वर्षांपासून जिल्हा परिषद आरोग्य विभाग, हिवताप विभागाने डेंग्यू शोधमोहीमेवर भर दिला आहे. मागील वर्षी जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांचा यात मोठ्या प्रमाणात सहभाग घेण्यात आला. ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आल्याने याची दखल आरोग्य विभागाच्या संचालकांनी घेतली. भंडारा जिल्ह्यात राबविण्यात आलेला डेंग्यू शोधमोहीमेचा पॅटर्न राज्यभरात राबविण्यात येत आहे. या महत्वाकांक्षी जनजागृतीला तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विजय डोईफोडे यांचा महत्वाचा वाटा आहे. त्यांच्यासोबत हिवताप विभागाचे डॉ.आर.डी. झलके यांच्यासह संपूर्ण आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी यात सहभाग घेतला होता.
जिल्हा हिवताप कार्यालयाने यावर्षी कीटकजन्य आजार नियंत्रणाविषयी बऱ्यापैकी उपाययोजना केल्या गेलेल्या आहेत. जागतिक हिवताप दिवसानिमित्त जिल्ह्यातील ४६ अतिसंवेदनशील गावातील सरपंच व सचिवांची कीटकजन्य व जलजन्य आजाराविषयी कार्यशाळा घेतली. त्यानंतर प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. सोबत कार्यशाळेत डेंग्यू डास अळी, अ‍ॅनाफेलीक्स, क्युलेक्स आदी डासांचे प्रकार तसेच गप्पी मासे, धुर फवारणी यंत्र, कीटकनाशक औषधी उपकरण आदींचे प्रदर्शन व मार्गदर्शन करण्यात आले. डेंग्यू डास दिवसानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्रात डेंग्यू दिवस कार्यक्रम व दिंडीचे आयोजन करण्यात आले. तालुकास्तरीय कार्यशाळेच्या आयोजनातून सात तालुक्यातील ३९४ ग्रामपंचायत सरपंच व सचिवांची कीटकजन्य व जलजन्य आजाराविषयी कार्यशाळा घेण्यात आली. यासाठी खासगी वैद्यकीय व्यवसायीकांची कार्यशाळाही घेण्यात आली. भंडारा शहरातील ३५ च्या वर वैद्यकीय व्यवसायीक ज्यात बालरोग चिकित्सक, प्रसुतीतज्ज्ञ यांची संयुक्तरित्या कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेला पुणे येथून हिवताप व डेंग्यू विषयक प्रशिक्षण घेऊन आलेले डॉ.अमित कावळे यांनी मार्गदर्शन केले.
वार्षिक कॅलेंडर कृती योजनेअंतर्गत जानेवारी ते जून महिन्यापर्यंत ग्रामसभेचे आयोजन आशा स्वयंसेविका यांना प्रशिक्षण व आर.डी.के. चा वापर कीटकशास्त्रीय सर्व्हेक्षण आदींची माहिती देण्यात आली. कीटकनाशक फवारणी कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील ३६ संवेदनशिल गावातील ६० हजार १९ लोकसंख्येची निवड करण्यात आली. त्यानंतर कीटकनाशक फवारणीचा कार्यक्रम राबविण्यात आला. यासाठी ७२ हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. खासगी वैद्यकीय व्यवसायीकांची जलदताप रुग्ण सर्व्हेक्षण, पंचायत राज सदस्यांची तालुकास्तरीय सभा, दिंडीचे आयोजन, कंटेनर सर्व्हेक्षण, व्ही.एस.एस. ची सभा, डासोत्पत्ती स्थानात गप्पी मासे सोडण्याचा कार्यक्रम, बचत गट आदींना मार्गदर्शन करण्यात आले. स्थलांतरीत कामगारांना आर.डी.के. च्या माध्यमातून रक्त नमूने तपासणी करण्यात आली. (शहर प्रतिनिधी)

डेंग्यू टाळण्याच्या उपाययोजना
घरातील फुलदाण्या व बागेतील कुंड्या यातील पाणी नियमितपणे बदलवा. पाणी साठवणीची ठिकाणी बॅरेल, सिंटेक्स टाकी आदींची पाहणी करा व आठवड्यातून एकदा रिकामी करा, पावसाचे पाणी साचेल अशा कोणत्याही वस्तू घराबाहेर ठेवू नका, उदा. टायर, करवंट्या, रंगाचे डबे, प्लास्टीकचे कप, पाण्याच्या बॉटल्स आदी. खड्याखाली साचलेले पाणी, फ्रिज डिफ्रॉस्ट ट्रे व एसी डकमध्ये पाणी साचू देऊ नका.
१००० कर्मचाऱ्यांचा समावेश
शालेय डेंग्यू डास अळी शोधमोहीमेत जिल्ह्यातील १९७ शाळांमधील ४८ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदविला आहे. यात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक व खासगी शाळांमधील इयत्ता पाचवी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. यासोबतच खासगी वैद्यकीय व्यवसायिक, खासगी सामाजिक संस्था, आरोग्य विभागाचे कर्मचारी, मलेरिया वर्कर, वैद्यकीय अधिकारी, आशा स्वयंसेविका, ए.एन.एम. अशा १००० कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. ७७४ गावांमध्ये ही शोधमोहीम राबविण्यात येत आहे. शालेय विद्यार्थ्यांचा या मोहिमेत सहभाग करून घेतल्याने ही मोहिम खऱ्या अर्थाने पूर्णत्वास आली आहे.

विद्यार्थी व कर्मचारी तथा स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून डेंग्यू शोधमोहीम राबविण्यात येत आहे. दर शनिवारला डेंग्यू डास शोधमोहीम राबविण्यात येते. लोकसहभागाची नितांत गरज आहे. नागरिकांची जनजागृती करण्यावर आरोग्य विभागाने भर दिला आहे.
- आर.डी. झलके, जिल्हा हिवताप अधिकारी, भंडारा

Web Title: 48 thousand students participate in the eradication of dengue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.