४७६ गणेश मंडळांची वीज जोडणी अनधिकृत

By Admin | Updated: September 11, 2016 00:24 IST2016-09-11T00:24:13+5:302016-09-11T00:24:13+5:30

जिल्ह्यात ५५४ सार्वजनिक गणेश मंडळांनी गणरायाची स्थापना केली आहे.

476 Ganesh Mandal's power connection is unauthorized | ४७६ गणेश मंडळांची वीज जोडणी अनधिकृत

४७६ गणेश मंडळांची वीज जोडणी अनधिकृत

केवळ ७८ मंडळांनी घेतली परवानगी : अनेक मंडळांवर कारवाईची टांगती तलवार
प्रशांत देसाई भंडारा
जिल्ह्यात ५५४ सार्वजनिक गणेश मंडळांनी गणरायाची स्थापना केली आहे. यातिल केवळ ७८ गणेश मंडळांनी महावितरणला रितसर अर्ज करून विघ्नहर्त्यासाठी वीज जोडणी घेतली आहे. तर उर्वरित ४७६ गणेश मंडळांनी वीज जोडणीची परवानगी घेतलेली नसल्याने त्यांचा पुरवठा अनधिकृत असल्याची गंभीर बाब उघडकीस समोर आहे. केवळ गणेशभक्तांमुळे जगाचा तारणहार गणरायाला अनेक ठिकाणी अंधारात किंवा महावितरणच्या कारवाईला सामोरे जावे लागण्याचा प्रसंग ओढविण्याची नामुष्की आली आहे.
आपल्या लाडक्या गणरायाच्या आगमणासाठी गणेशभक्तांना आस लागली होती. अवघ्या दहा दिवसाच्या आगमणादरम्यान गणराया सर्वांना आपलेसे करून जातात. अशा गणरायच्या आगमणासाठी अनेक गणेशभक्तांनी त्याच्या दहा दिवसाच्या मुक्कामात मोठी सरबराई करतात. त्यासाठी मोठा शामियाना ते विद्युत रोषणाईची व्यवस्था करतात. गणपतीच्या महोत्सवादरम्यान कुठलेही विघ्न येऊ नये सर्वजण सर्वोतोपरी कार्य करतात. महावितरणनेही गणरायासाठी सवलतीत वीज जोडणी देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
जिल्ह्यात यावर्षी ५५४ ठिकाणी सार्वजनिक गणेशांची स्थापना करण्यात आलेली आहे. गणेशोत्सवाच्या काळात बरेचदा सार्वजनिक मंडळांकडून अवैधरीत्या वीज कनेक्शन घेण्यात येतात. या पार्श्वभूमिवर वीज चोरीच्या घटना रोखण्यासाठी महावितरणने आता घरगुती वीज दरांपेक्षाही कमी दराने वीज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता गणेशोत्सव मंडळांना ३ रूपये ७५ पैसे प्रतियुनिट दराने तात्पुरती अधिकृत वीज जोडणी दिली जाणार आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडप किंवा रोषणाई, देखाव्यासाठी लागणारी वीज यंत्रणा ही अधिकृत वीज कंत्राटदारांकडून करून घेण्यात यावी व अर्थिंगचीही खबरदारी घेण्यात यावी. वायरींगसाठी वापरण्यात येणारे वायर्स हे वीजभारासाठी सक्षम नसल्यास शार्टसर्किटचा धोका निर्माण होतो. याशिवाय सध्या पावसाळा असल्याने तारा लांबलेले किंवा अनेक ठिकाणी तुटलेले पण टेपने जोडलेले असल्यास वीजपुरवठा खंडित होण्यासह अपघाताची मोठी शक्यता असते.
विजेचा लघुदाब, उच्चदाब, वाहिन्या, रोहित्राचा गणेशोत्सवातील आणि मिरवणुकीतील देखाव्यांना स्पर्श होणार नाही, अशा सुरक्षित अंतरावर देखावे तयार करावेत. गणेशोत्सवात वीज पुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्युट्रल घेणे अत्यावश्यक आहे. वीज पुरवठा बंद असताना जनरेटर सुरु केल्यास एकाच न्युट्रलमुळे जनरेटरमधील वीज ही लघुदाब वाहिनीत प्रवाहित होते आणि त्यातून जीवघेणे अपघात घडतात. त्यामुळे भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सार्वजनिक गणेश मंडळांनी वीज सुरक्षेबाबत उपाययोजनांमध्ये तडजोड करू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.

जोडणी नसल्याने कारवाईची शक्यता
गणेशोत्सव साजरा करणाऱ्या गणेश मंडळाला सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी महावितरणने एक हजार रूपये अनामत भरून तात्पूरती वीज जोडणी देण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील केवळ ७८ सार्वजनिक गणेश मंडळांनी महावितरणकडे वीज जोडणीसाठी रितसर अर्ज सादर केला. अशा सर्व ७८ मंडळांना अधिकृत वीज पुरवठा दिलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात ५५४ ठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळाची स्थापना झाली असली तरी अनेक मंडळाची वीज जोडणी अनधिकृत आहे. त्यामुळे अशा गणेश मंडळांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
वीज जोडणीतून सार्वजनिक सुरक्षा
सर्वधर्मीयांच्या सार्वजनिक उत्सवांसाठी तात्पुरत्या वीज जोडणीसाठी प्रतियुनिट ३ रूपये ७५ पैसे अधिक इंधन अधिभार असे वीज दर आहेत. हा दर घरगुती वीज दरांपेक्षाही कमी आहे. धार्मिक उत्सवांसाठी अधिकृतच वीजपुरवठा घ्यावा आणि त्यायोगे सार्वजनिक सुरक्षेला महत्त्व द्यावे, यासाठी तात्पुरत्या वीज जोडणीचा दर घरगुती वीज दरापेक्षा कमी आहे.

गणेशोत्सवादरम्यानच्या १५ दिवसांसाठी गणेश मंडळांनी एक हजार रूपये अनामत भरून रितसर वीज जोडणी घ्यावी. बील आल्यानंतर अनामतमधील रक्कम शिल्लक राहिल्यास ती मंडळाला परत करण्यात येईल. जिल्ह्यातील केवळ ७८ गणेश मंडळांनी रितसर अर्ज भरून वीज जोडणी घेतलेली आहे. अनेक गणेश मंडळांची स्थापना ही गणेश मंदीराच्या परिसरात झालेली असल्यास तिथे वीज जोडणीचा प्रश्न येत नाही.
- सुरेश मडावी,
अधिक्षक अभियंता, महावितरण भंडारा.

Web Title: 476 Ganesh Mandal's power connection is unauthorized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.