४५ विद्यार्थी विषबाधेपासून बचावले
By Admin | Updated: October 16, 2015 01:01 IST2015-10-16T01:01:33+5:302015-10-16T01:01:33+5:30
शनिवारला शाळा सुटल्यानंतर शालेय पोषण आहार असलेल्या खोलीला कुलूप लावण्याचे अनावधानाने राहून गेले.

४५ विद्यार्थी विषबाधेपासून बचावले
सीतेपार येथील प्रकार : चार दिवस पोषण आहाराच्या खोलीची दारे उघडे
मोहन भोयरतुमसर
शनिवारला शाळा सुटल्यानंतर शालेय पोषण आहार असलेल्या खोलीला कुलूप लावण्याचे अनावधानाने राहून गेले. त्यानंतर सलग तीन दिवस शाळेला सुटी होती. खिचडी तयार करणारी भांडी व इतर साहित्यावर काहीतरी द्रवपदार्थ पडलेला दिसून आला. जर याच भांड्यात अन्न शिजविले असते तर या शाळेतील ४५ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असती. परंतु सरपंच व शिक्षण समितीच्या अध्यक्षांच्या सतर्कतेमुळे सितेपार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत होणारा हा प्रकार टळला.
मंगळवारला सरपंच व शाळा समितीचे अध्यक्षांनी शाळा परिसरात कामाची पाहणी करीत असताना त्यांना शालेय पोषण आहाराची खोली उघडी असल्याचे दिसले. या खोलीत खिचडी तयार करणारी भांडी व इतर साहित्यावर हात धुण्याचा द्रवपदार्थ इतरत्र पसरलेला दिसून आला. त्यामुळे त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून शालेय पोषण आहाराचे साहित्य ग्रामपंचायत कार्यालयात आणून ठेवले. बुधवारी दुपारी ३ वाजता मुख्याध्यापिका उषा तिडके यांनी शाळेत स्वयंपाकाचे साहित्य नसल्यामुळे सिहोरा पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार नोंदविली. त्यानंतर सिहोरा पोलीस चौकशीसाठी आले. बुधवारला विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यात आला नाही. गुरुवारला खबरदारीचा उपाय म्हणून शिक्षकांनी तयार केलेली खिचडी एका कुत्र्याला व बकरीला खायला दिली. चोरी झाली नसताना मुख्याध्यापिकेने चोरीची तक्रार कशी केली. यामुळे संतप्त सरपंच गजानन लांजेवार, उपसरपंच शिशुपाल ईखार, पोलीस पाटील भृपत सार्वे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मधुकर सार्वे यांनी गुरुवारला ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांची बैठक घेतली. त्यानंतर दुपारी १२ वाजता खंडविकास अधिकारी केशव गडापाडे, पंचायत समिती सभापती कविता बनकर, जिल्हा परिषद सदस्य धनेंद्र तुरकर, प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष राजन सव्वालाखे, तालुका शालेय पोषण आहारप्रमुखांनी भेट देऊन पाहणी केली.