४२७ गावांमध्ये होणार माती परीक्षण

By Admin | Updated: May 17, 2017 00:18 IST2017-05-17T00:18:21+5:302017-05-17T00:18:21+5:30

मानवी आरोग्याप्रमाणे जमिनीचीही आरोग्य तपासणी कृषी विभागातर्फे करण्यात येत असते.

427 villages will be tested in the soil | ४२७ गावांमध्ये होणार माती परीक्षण

४२७ गावांमध्ये होणार माती परीक्षण

उत्पादन वाढीवर भर : मातीचे २२ हजार २७६ नमुने घेणार
इंद्रपाल कटकवार । लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : मानवी आरोग्याप्रमाणे जमिनीचीही आरोग्य तपासणी कृषी विभागातर्फे करण्यात येत असते. यात चांगल्या उत्पादनासाठी जमीन आरोग्यविषयी शेतकरी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण येत्या वित्तीय वर्षात करण्यात येणार आहे. याशिवाय जिल्ह्यातील ४२७ गावांमधील शेतजमिनीतील मृदा नमून्यांची तपासणी करण्यात येणार आहे.
भंडारा जिल्ह्यात भात पिकाचे उत्पादन घेतले जाते. यात क्षेत्रनिहाय उत्पादन किती, या आकडेवारीची नोंद केली जात असली तरी जमिनीचा कस व त्याची उत्पादकताही ठरविली जाते. जमिनीतील क्षार, नत्र यासह अन्य खनिज पदार्थांची मात्रा मातीत किती प्रमाणात आहे, तसेच जिल्हानिहाय अन्नद्रव्याच्या स्थितीबाबत माहिती गोळा करून कोणते पीक घेण्यात यावे, याची शिफारस करण्यात येते.
खरीप हंमाग २०१७ च्या नियोजनांतर्गत जिल्ह्यातील एकूण शेतकऱ्यांपैकी निम्म्या शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिकेचे वाटप करण्याचे उदिष्ठ ठरविण्यात आले आहे. विशेष म्हणजे जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खताच्या वापराबाबत प्रात्यक्षिक देण्यात येणार आहे.
मृद तपासणी अंतर्गत भंडारा उपविभागांतर्गत बागायती शेतीसाठी १० हजार २७४ तर साकोली उपविभागांतर्गत १५ हजार ९७६ नमूने तपासणीसाठी घेतली जाणार आहेत. भंडारा उपविभागांतर्गत जिरायत शेतीसाठी ४ हजार १११ तर साकोली उपविभागांतर्गत ६ हजार हजार ३०० नमूने तपासणीसाठी घेतली जाणार आहेत. यात दोन्ही मिळून २२ हजार २७६ मातीचे नमुने तपासली जाणार आहेत.

तालुकानिहाय गावांची संख्या
सन २०१७-१८ या वर्षात राष्टीय मृद आरोग्य अभियानअंतर्गत मृद नमुने तपासणीसाठी जिल्यातील ४२७ गावांची निवड करण्यात आली आहे. यात भंडारा तालुक्यातील ८७, मोहाडी ५०, पवनी ७६, तुमसर ७३, साकोली ५१, लाखांदूर व लाखनी तालुक्यातील प्रत्येकी ४५ गावे समाविष्ट करण्यात आली आहेत. यात एकूण एक लक्ष २,४६८ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली असणार आहे. यात भंडारा उपविभागातील ६६ हजार ५१३ हेक्टर तर साकोली उपविभागातील ३५९५४ हेक्टर शेतजमिनीची नोंद आहे.

लक्षांकामध्ये चढ-ऊतार
राष्टीय मृद आरोग्य अभियानअंतर्गत सन २०१५-१६ मध्ये २९२ गावांची निवड करून १४,८९५ मातीचे नमुने घेवून तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी ७५,७०७ जमिन आरोग्य पत्रिका वाटप करण्यात आल्या होत्या. सन २०१६-१७ मध्ये ५५५ गावांची निवड करून २८,५०८ मातीचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आली होती. मागीलवर्षी ७८,४३५ जमिन आरोग्य पत्रिका वाटप करण्यात आल्या होत्या. यावर्षी मात्र ४२७ गावांची निवड करून २२ हजार २७६ माती नमुने तपासणीचे उदिष्ट ठेवण्यात आले आहे.

Web Title: 427 villages will be tested in the soil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.