जलयुक्त शिवार अभियानासाठी ४० कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 23:49 IST2017-08-10T23:47:35+5:302017-08-10T23:49:12+5:30

शेतकरी सधन व समृद्ध व्हावा या महत्त्वाकांक्षी दृष्टिक्षेपातून राज्य शासनाने सन २०१५ पासून जलयुक्त शिवार ही संकल्पना राबविण्यास सुरूवात केली आहे.

40 crores fund for the Jalakit Shivar campaign | जलयुक्त शिवार अभियानासाठी ४० कोटींचा निधी

जलयुक्त शिवार अभियानासाठी ४० कोटींचा निधी

ठळक मुद्दे१,३८५ कामांचा समावेश : गाव निहाय प्रस्तावांवर झाली चर्चा

इंद्रपाल कटकवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शेतकरी सधन व समृद्ध व्हावा या महत्त्वाकांक्षी दृष्टिक्षेपातून राज्य शासनाने सन २०१५ पासून जलयुक्त शिवार ही संकल्पना राबविण्यास सुरूवात केली आहे. यात पुर्व विदर्भातील भंडारा जिल्हा माघारला असला तरी सन २०१७-१८ या वित्तीय वर्षात जलयुक्त शिवारांतर्गत सुधारित आराखडानुसार ४० कोटी ३५ लक्ष रूपयांचा निधी मिळणार आहे.
भंडारा जिल्ह्यात मुख्यत: धान हे मुख्य पीक आहे. मात्र अस्मानी व सुल्तानी संकटामुळे धान उत्पादकांवर आर्थिक संकट कोसळत असते. बहुतांश वेळा शेतकरी सिंचन सुविधा उपलब्ध नसल्याने आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलतात. याशिवाय सिंचन देऊनही पीक उत्पादन वेळेवर व अपेक्षेनुरूप होत नाहीत. परिणामी कर्जबाजारीपणा ही समस्या शेवटपर्यंत सुटत नाही.
भंडारा जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी हा निसर्गाच्या पावसावर धानाची शेती करीत असतो. यातही बहुतांश शेतकºयांकडे विहिर किंवा बोरवेल किंवा अन्य जलस्त्रोतांचा अभाव असतो. परिणामी राज्य शासनाने जिल्हानिहाय लक्षांकाप्रमाणे गावांची निवड केलेली आहे.
यात २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील ८६ गावे, २०१६-१७ मध्ये ५९ गावांची निवड केलेली होती.
यानुसार २०१७-१८ अंतर्गतही जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत सुधारित आराखड्याला मान्यता देण्यासाठी गावनिहाय प्रस्तावित कामांवर चर्चा करण्यात आली. यात यावर्षी १३८५ कामे करण्यात येणार असून ४० कोटी ३५ लक्ष ६७ हजार रूपयांचा निधीचा अंतिम आराखडा तयार करण्यात आलेला आहे.
यासंदर्भात विभागीय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पुर्व विदर्भातील जलशिवाराची कामे सुरू आहेत.
पावसाअभावी योजनेला ग्रहण
राज्य शासनाने मोठा गाजावाजा करून जलयुक्त शिवार ही योजना सुरू केली. दोन वर्षांपासून जिल्ह्यातील जवळपास १४० गावांमध्ये कोट्यवधी रूपये खर्चून बांधकाम करण्यात आले. याचा बहुतांश शेतकºयांनी फायदाही घेतला. मात्र यावर्षी हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस बरसला नाही. पावसाने सरासरीही गाठली नसल्याने जलयुक्त शिवारांतर्गत खोदण्यात आलेल्या बोड्यांमध्ये पाणीच गोळा झाले नाही. परिणामी पावसाअभावी या योजनेला ग्रहण लागणार काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
 

Web Title: 40 crores fund for the Jalakit Shivar campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.