४९९ बालके कुपोषणाच्या विळख्यात
By Admin | Updated: November 16, 2014 22:44 IST2014-11-16T22:44:18+5:302014-11-16T22:44:18+5:30
महिला व बाल विकास प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातुन चालविण्यात येत असलेल्या जिल्ह्यातील अंगणवाडीतील ४९९ बालके तीव्र कमी वजनाच्या क्षेणीत आहेत. ही बालके कुपोषणाच्या विळख्यात असले

४९९ बालके कुपोषणाच्या विळख्यात
भंडारा तालुक्यात सर्वाधिक प्रमाण : प्रशासन म्हणते 'आॅल ईज वेल'
प्रशांत देसाई -भंडारा
महिला व बाल विकास प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातुन चालविण्यात येत असलेल्या जिल्ह्यातील अंगणवाडीतील ४९९ बालके तीव्र कमी वजनाच्या क्षेणीत आहेत. ही बालके कुपोषणाच्या विळख्यात असले तरी प्रशासनाकडून 'आॅल ईज वेल' असल्याचे सांगितल्या जात आहे.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना गेल्या तीन दशकाहून अधिक काळापासून राबविण्यात येत आहे. या योजनेमुळे मुलांच्या विकासात लक्षणीय सुधारणा झाली असे प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. पण तरी देखील कुपोषणावर नियंत्रण आणण्यासाठी संपूर्ण बाल पोषण पद्धतीमध्येच व्यापक बदल होणे गरजेचे आहे.
आॅक्टोबर महिन्याच्या शेवटी बालविकास प्रकल्प विभागाने घेतलेल्या नोंदीनुसार महिला व बाल विकास प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात ० ते ६ वर्ष वजन घेतलेल्या बालकांची संख्या ८६ हजार ३८३ असल्याची नोंद आहे. यातील तीव्र कमी वजन गटात मोडणारी बालके ४९९ आहे. साधारण श्रेणीत ८२ हजार ५६८ बालकांचा समावेश आहे. कमी वजन गटातील बालकांचा आकडा ३ हजार ३१६ आहे. यात सर्वाधिक तीव्र कमी वजनाच्या क्षेणीतील बालके ही भंडारा तालुक्यात असल्याचे समोर आले आहे.
ग्रामीण, आदिवासी व नागरी प्रकल्प क्षेत्रामधील अंगणवाडीतील ६ महिने व ३ वर्षे वयोगटातील लाभार्थी, गरोदर व स्तनदामाता, तीव्र कमी वजनाची बालके यांना घरपोच आहार पुरविल्या जाते. आहारात गहु, गुळ, सोयाबीन, शेंगदाने आदींचा समावेश आहे.
अर्भक व बालकांच्या पोषण पद्धतीत बदल करण्याची गरज आहे. आहारात विविधता आणणे व उपलब्ध अन्न पदार्थांचा योग्य वापर करणे, सुक्ष्म पोषक तत्वांचा आहार रासायनिक पध्दतीने समुद्धीकरण करणे, सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने वैयक्तिक स्वच्छता, सार्वजनिक अथवा परिसर स्वच्छता लसीकरण याबाबत जनमानसात जागृकता निर्माण करणे या मुद्यांवर भर देणे गरजेचे आहे.