३७८ ठिकाणी होणार दुर्गामातेची प्रतिष्ठापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 23:05 IST2017-09-20T23:05:35+5:302017-09-20T23:05:48+5:30
जगतजननी आई जगदंबेच्या नवरात्रोत्सवाला गुरुवारपासून प्रारंभ होत आहे.

३७८ ठिकाणी होणार दुर्गामातेची प्रतिष्ठापना
इंद्रपाल कटकवार। लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जगतजननी आई जगदंबेच्या नवरात्रोत्सवाला गुरुवारपासून प्रारंभ होत आहे. यात जिल्हाभरात नवरात्रोत्सवाच्या तयारीची धुम असून जिल्ह्यात ३७८ ठिकाणी सार्वजनिक श्री दुर्गामातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे.
नवरात्र म्हणजे या नऊ दिवसात आई जगदंबेच्या नऊ रुपांची आराधना करण्याचे पवित्र दिवस मानण्यात येतात. यात बहुतांश भक्तगण उपवास ठेवून मातेच्या दर्शनासाठी विविध ठिकाणी जात असतात. शहरासह जिल्ह्यातही नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी भाविकांनी कंबर कसली आहे. मूर्तीकारांनीही मूर्तीवर अखेरचा हात फिरवित प्रतिष्ठापनेसाठी आपली कलाकौशल्य पणाला लावली आहे. शहरात राजीव गांधी चौक, गांधी चौक यासह प्रमुख चौकात विविध दुर्गा उत्सव मंडळातर्फे सार्वजनिक उत्सव साजरा करण्यात येणार असून विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवाणी या निमित्ताने बघायला मिळणार आहे.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
जिल्ह्यात उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीकोणातून जिल्हा पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला आहे. यात १५ पोलीस ठाणे अंतर्गत जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्या मार्गदर्शनात अधिकारी व कर्मचारी यांची तैनाती करण्यात आली आहे. यात सहा उपविभागीय पोलीस अधिकारी, ११ पोलीस निरीक्षक, २१ उपपोलीस निरीक्षक, ३० सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, १०५० पोलीस कर्मचारी तथा होमगार्डचे ५०० जवान विविध ठिकाणी आपली सेवा देणार आहेत. राज्य राखीव दलाच्या दोन कंपन्याही तैनात करण्यात आल्या आहेत.