३,४४७ शेतकऱ्यांना बसला श्वापदांचा फटका
By Admin | Updated: March 22, 2015 01:36 IST2015-03-22T01:36:07+5:302015-03-22T01:36:07+5:30
भंडारा वन विभागांतर्गत जिल्ह्यातील विविध वनपरिक्षेत्रात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात शेतपिकांसह पशुधन व मानवहानी झालेल्या आहेत.

३,४४७ शेतकऱ्यांना बसला श्वापदांचा फटका
लोकमत रविवार विशेष
देवानंद नंदेश्वर भंडारा
भंडारा वन विभागांतर्गत जिल्ह्यातील विविध वनपरिक्षेत्रात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात शेतपिकांसह पशुधन व मानवहानी झालेल्या आहेत. श्वापदांच्या पाच वर्षात नऊ व्यक्तींचा बळी तर १४७ मनुष्य जखमी, ३९२ पशुधन ठार तर ३,४४७ शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे. पाच वर्षात नुकसानीपोटी भंडारा वनविभागाने ३,९९५ प्रकरणांत २ कोटी ३८ लाख ९२ हजार ७०० रूपयांचे नुकसान भरपाई वाटप केले आहे.
सन २०१४- १५ मध्ये फेब्रुवारी महिन्यापर्यत श्वापदांनी केलेल्या शेतपिकांच्या नुकसान भरपाईचे ९६३ प्रकरण वनविभागाकडे आले. त्यात ५३ लाख ७ हजार ४६० रूपयांची नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे.
श्वापदांंनी पशुधनावर हल्ला करून ८२ पशुधनाची हानी केली. त्या गोपालकांना ५ लाख १६ हजार ५६० रूपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. श्वापदांनी मनुष्यांवर हल्ला करून ४७ जणांना जखमी केल्याच्या घटना घडल्या आहेत.
याप्रकरणी वनविभागाने १० लाख ८३ हजार २३० रूपयांची भरपाई कुटूंबियांना दिलीे. या वर्षात आतापर्यत १,०९२ प्रकरणांसाठी वन विभागाने ६९ लाख ०७ हजार २५० रूपयांचे नुकसान वाटप केले आहे.
जिल्ह्यात सातही तालुक्यात जंगलाचा काही भाग येत आहे. या जंगलातील श्वापदे अन्नाच्या शोधात येत लगतच्या शेतात धुडगूस घालतात. या श्वापदांकडून शेतातील कोणत्याही एका भागातील पिकाचे नुकसान होते. नुकसान करून पळून जाताना ही श्वापदे शेतातील पिकच तुडवत असल्याचे चित्र आहे.
सन २०१०-११ पासून फेब्रुवारी २०१५ या पाच वर्षाच्या दरम्यान श्वापदांनी मोठ्या प्रमाणात शेतपिक, पशुधन व मानवहानी केली आहे. भंडारा वन विभागात ३ हजार ९९५ प्रकरणांची नोंद करण्यात आलेली आहेत. त्यातील नुकसानग्रस्तांना २ कोटी ३८ लााख ९२ हजार ९२५ रूपयांचे वाटप करण्यात आले आहे. यात शेतपिकांच्या नुकसानीपोटी १ कोटी ६१ लाख ४५ हजार ४० रुपए, पशुधनाच्या नुकसानीसाठी २६ लाख ६० हजार ९० रुपये, जखमी मनुष्यांना २९ लाख ८७ हजार ७९५ रुपए तर ठार झालेल्या नऊ व्यक्तींच्या कुटूंबियांना २१ लाखांचे वाटप करण्यात आले आहे.
२०१०-११ मध्ये श्वापदांनी ८१ शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे नुकसान केले, ७७ पशुधन ठार, २७ जण जखमी तर दोघांचा बळी घेतला. वनविभागने १८७ प्रकरणात १६ लाख ९१ हजार ६८४ रूपयांचे नुकसान भरपाई वाटप केली. २०११-१२ मध्ये शेतपिकांची २२५ प्रकरणे, ९६ पशुधन ठार, ४३ जण जखमी तर तिघांचा मृत्यू झाला. ३६७ प्रकरणात वनविभागाने २७ लाख ६ हजार ८४७ रूपयांचे नुकसान भरपाई वाटप केले.
सन २०१२-१३ मध्ये ७८६ शेतपिकांची नुकसानीसंबंधी प्रकरणे, ६४ पशुधन ठार, १६ जण जखमी तर तिघांचा बळी श्वापदांनी घेतला. या ८६९ प्रकरणात ४८ लाख २७ हजार ९५२ रूपयांचे नुकसान भरपाई वाटप करण्यात आले. २०१३-१४ मध्ये श्वापदांनी १ हजार ३९२ शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे नुकसान केले. ७३ पशुधन ठार, १४ जण जखमी तर एकाचा बळी घेतला. १ हजार ४८० प्रकरणात वनविभागने ७७ लाख ५९ हजार १९२ रूपयांची मदत दिली आहे.