३२८ सिंचन विहिरींना हिरवी झेंडी
By Admin | Updated: February 15, 2016 00:13 IST2016-02-15T00:13:52+5:302016-02-15T00:13:52+5:30
तुमसर तालुक्यातून जिवनदायीनी वैनगंगा तथा बावनथडी नद्या बारमाही वाहतात. बावनथडी प्रकल्प पूर्णत्वास येवून सिंचनाची सोय झाल्याची पाठ थोपविण्यात येत आहे, ....

३२८ सिंचन विहिरींना हिरवी झेंडी
तीन लाखांचा निधी : उमरवाडा येथून सुरूवात, अल्पभूधारक शेतकऱ्यांना लाभ
तुमसर : तुमसर तालुक्यातून जिवनदायीनी वैनगंगा तथा बावनथडी नद्या बारमाही वाहतात. बावनथडी प्रकल्प पूर्णत्वास येवून सिंचनाची सोय झाल्याची पाठ थोपविण्यात येत आहे, परंतु अनेक शेतकऱ्यांना सिंचनाची सोय आजही झाली नाही. शासनाने तुमसर तालुक्याकरिता ३२८ विहीरी अल्पभूधारक शेतकऱ्यांकरिता मंजूर केल्या. तालुक्यात प्रत्यक्ष विहीरीच्या कामांना सुरूवातही झाली.
मागील काही मोसमापासून पाऊस दगा देत आहे. सिंचन प्रकल्पातून शेती सिंचनाकरिता सर्वच शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही. यात अल्पभूधारक शेतकरी भरडला जात आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांवर कधी अस्मानी तर कधी सुल्तानी संकट ओढवले. शासनाने अल्पभूधारक पाच एकर व त्यापेक्षा कमी शेती असणाऱ्या शेतकऱ्याकरिता शेतातील विहीरी अनुदान निधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
तुमसर तालुक्यात ३२८ विहीरींना मंजुरी प्रदान केली आहे. उमरवाडा येथे सखाराम कांबळे यांच्या शेतात सिंचन विहीरीचे भूमीपूजन बुधवारी खंडविकास अधिकारी केशव गड्डापाडे यांनी केले.
प्रत्येक विहीरीकरिता तीन लक्ष रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला. ज्या शेतकऱ्यांना इतर सिंचन सोयी सुविधा उपलब्ध नाही व जे शेतकरी अल्पभूधारक आहेत अशाच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)
सिंचन विहीरींचा प्रत्यक्ष लाभ खऱ्या गरजू शेतकऱ्यांनाच मिळावा खंडविकास अधिकारी केशव गड्डापाडे व संबंधित अधिकाऱ्यांनी काटेकोर चौकशी अंती विहिरींना मंजुरी प्रदान केली आहे.