३२ एस.टी. कर्मचारी कामावर परतले; आठ बसेस धावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2021 05:00 IST2021-12-23T05:00:00+5:302021-12-23T05:00:25+5:30

एस.टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी कर्मचारी गत ५१ दिवसांपासून संपावर आहेत. या कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा यासाठी वरिष्ठ पातळीवरून बोलणी झाली. मात्र, कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. अशातच परिवहन मंत्री अनिल परब यांनी २२ व २३ डिसेंबरला कामावर हजर होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. सेवासमाप्ती, निलंबन आणि बदल्या मागे घेतल्या जातील असे आश्वासन दिले.

32 S.T. Staff returned to work; Eight buses ran | ३२ एस.टी. कर्मचारी कामावर परतले; आठ बसेस धावल्या

३२ एस.टी. कर्मचारी कामावर परतले; आठ बसेस धावल्या

लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : तब्बल ५१ दिवसांपासून संप करणारे कर्मचारी दोन दिवसांत कामावर रुजू झाल्यास कोणतीही कारवाई करणार नाही, अशी घोषणा परिवहन मंत्र्यांनी करताच भंडारा विभागातील ३२ कर्मचारी बुधवारी कामावर परतले. आठ बसेस रस्त्यावर धावल्या. गुरुवारी मोठ्या प्रमाणात कर्मचारी कामावर परतील अशी आशा आहे.
एस.टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी कर्मचारी गत ५१ दिवसांपासून संपावर आहेत. या कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा यासाठी वरिष्ठ पातळीवरून बोलणी झाली. मात्र, कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. अशातच परिवहन मंत्री अनिल परब यांनी २२ व २३ डिसेंबरला कामावर हजर होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. सेवासमाप्ती, निलंबन आणि बदल्या मागे घेतल्या जातील असे आश्वासन दिले. त्यावरून बुधवारी भंडारा विभागातील ३२ कर्मचारी रुजू झाले. सध्या भंडारा विभागातील १५२३ कर्मचाऱ्यांपैकी १२३२ कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. 
गत तीन आठवड्यांपासून भंडारा व साकोली आगारातून बससेवा सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. बुधवारी ३२ कर्मचारी कामावर रुजू झाल्याने आठ बसेस रस्त्यावर धावल्या. त्यात पाच बसेस भंडारा-नागपूर, दोन बसेस भंडारा-पवनी आणि एक बस भंडारा-साकोली या मार्गावर धावली. ३६७ पैकी ३५९ बसेस आजही आगारातच उभ्या आहेत. 
परिवहन मंत्र्यांनी केलेल्या आवाहनानुसार बुधवारी कर्मचारी परतल्याने दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारीही आणखी कर्मचारी परततील, अशी अपेक्षा एस.टी. महामंडळाला आहे. 
गत ५१ दिवसांपासून संप सुरू असल्याने ग्रामीण व शहरी प्रवासी वाहतूक विस्कळीत झाली आहे. प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. खासगी वाहनधारक प्रवाशांकडून दामदुप्पट तिकीट वसूल करीत आहेत.

५१ दिवसांत २१.७८ कोटींचे नुकसान 
-  राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा गत ५१ दिवसांपासून संप सुरू आहे. एस.टी. बसेस बंद असल्याने भंडारा विभागातील सहा आगारांचे तब्बल २१ कोटी ७८ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ऐन दिवाळीच्या काळात संप सुरू झाल्याने एस.टी.चे मोठे नुकसान झाले आहे. एस.टी. कर्मचाऱ्यांना कामावर येण्यासाठी वारंवार आवाहन केल्यानंतरही कर्मचारी मात्र आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.

बसमध्ये प्रवाशांची गर्दी
- महामंडळाच्या बोटावर मोजण्याएवढ्या बसेस सुरु असून या बसेसमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी असते. भंडारा-नागपूर या बसमध्ये तर पाय ठेवायलाही जागा नसते. दिवसभरात पाच बसेस या मार्गावर धावत असून प्रवासी एसटीलाच पसंती देत असल्याचे चित्र दिसत आहे.

परिवहन मंत्र्यांच्या आवाहनानुसार कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे. दोन दिवसाची शेवटची संधी कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. ही संधी कुणीही सोडू नये. कारण त्यानंतर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. भंडारा आगारातून बुधवारी आठ बसेस रस्त्यावर धावल्यात.
-डाॅ.चंद्रकांत वडस्कर, 
विभागीय वाहतूक अधिकारी.

 

Web Title: 32 S.T. Staff returned to work; Eight buses ran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.