पाच वर्षात आढळले ३,१०४ कुष्ठरोगी
By Admin | Updated: February 8, 2015 23:28 IST2015-02-08T23:28:37+5:302015-02-08T23:28:37+5:30
कुष्ठरोगाचे उच्चाटन करण्यासाठी राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम राबविण्यात येत असला तरी, मागील पाच वर्षात जिल्ह्यात ३ हजार १०४ कुष्ठरोगी आढळून आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

पाच वर्षात आढळले ३,१०४ कुष्ठरोगी
प्रशांत देसाई -भंडारा
कुष्ठरोगाचे उच्चाटन करण्यासाठी राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम राबविण्यात येत असला तरी, मागील पाच वर्षात जिल्ह्यात ३ हजार १०४ कुष्ठरोगी आढळून आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यात १,४५२ महिला, १,६५२ पुरूषांसह २६१ बालकांचा समावेश आहे. चालू वर्षी जानेवारीपर्यंत ४५१ कुष्ठरोगी असल्याचे निष्पन्न झाले असून या पाच वर्षात २ हजार ९६८ रूग्ण औषधोपचाराने बरे झाले, हे विशेष.
ज्या व्यक्तीला कुष्ठरोगाची लागण झाली अशाला समाज त्यांना वाळीत काढतात. कुष्ठरूग्णांना समाजात सन्मान मिळावा, यासाठी शासन योजनांची अंमलबजावणी करीत असला तरी, आजही त्यांचाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला नाही. अशा स्थितीत कुष्ठरोग निर्मूलनासाठी शासन राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम राबवित आहे. या मोहिमेत आढळून आलेल्या कुष्ठरूग्णांवर औषधोपचार करून त्यांच्याबाबत असलेले न्युनगंड दुर करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
सन २००९-१० पासून जानेवारी २०१५ पर्यंत जिल्ह्यात सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) व आरोग्य विभागाच्या माध्यमातून कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या पाच वर्षात जिल्ह्यात ३ हजार १०४ कुष्ठरूग्ण आढळून आले आहे. यात १ हजार ४५२ महिला, १ हजार ६५२ पुरूषांचा व ० ते १४ वर्ष वयोगटातील २६१ बालकांचा समावेश आहे.
या पाच वर्षात पुरूषांच्या तुलनेत महिला कुष्ठरूग्णांची संख्या दोनशेने कमी आहेत. तर एप्रिल ते जानेवारी या दहा महिन्यात जिल्ह्यात ४५१ कुष्ठरोगी आढळून आले आहे.
कुष्ठरोग बरा होण्यासाठी असांसर्गिक कुष्ठरूग्णांवर सहा ते नऊ महिन्यांपर्यंत औषधोपचार करण्यात येते. तर सांसर्गिक रूग्णांवर १२ महिने औषधोपचार करण्यात येतो. मागील पाच वर्षात औषधोपचाराने २ हजार ९६८ कुष्ठरोगी बरे झालेले आहेत. एप्रिल ते जानेवारी या दहा महिन्यात शोध मोहिमेदरम्यान ४५१ कुष्ठरूग्ण आढळून आले. यात १७८ महिला तर २७३ पुरूषांसह ४५ बालकांचा समावेश आहे.
यावर्षी ३४९ कुष्ठरूग्ण बरे झाल्याची नोंद आरोग्य विभागात आहे. जिल्ह्यातील कुष्ठरोगाचे समुळ उच्चाटण होण्यासाठी कुष्ठरोग विभाग व आरोग्य विभाग प्रयत्नरत आहेत.