पूरबाधित जागा ३० वर्षांच्या लीजवर
By Admin | Updated: February 25, 2016 00:33 IST2016-02-25T00:33:06+5:302016-02-25T00:33:06+5:30
शहरातील जलशुद्धीकरण केंद्र परिसरातील ५२ हजार ७३९ चौरस फूट जागा पूरबाधित असल्यामुळे महिला रुग्णालयाला नाकारण्यात आली.

पूरबाधित जागा ३० वर्षांच्या लीजवर
गैरव्यवहाराचा आरोप : महिला रुग्णालयाला जागा नाकारली
भंडारा : शहरातील जलशुद्धीकरण केंद्र परिसरातील ५२ हजार ७३९ चौरस फूट जागा पूरबाधित असल्यामुळे महिला रुग्णालयाला नाकारण्यात आली. मात्र, आता हीच जागा खासगी व्यक्तीला १ लाख रुपयात ३० वर्षांच्या लीजवर देण्यात आली. यात गैरव्यवहार झाल्याची तक्रार भ्रष्टाचाराविरोधी सामाजिक न्याय मंचने मुख्यमंत्र्यांकडे केली. यातील दोषींवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा १४ मार्चपासून उपोषण करण्याचा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
शहरातीलन नगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रालगत शीट क्रमांक ५७ - ३/२ व ५७ - ३/१ आखिव पत्रिकेनुसार ५२ हजार ७३९ चौरस फूट जागा शासकीय मालकीची आहे. वैनगंगेला पूर येतो. तेव्हा जलशुद्धीकरण केंद्रात अंदाजे २० फूट पुराचे पाणी असते.
सदर जागा जिल्ह्यात प्रस्तावित असलेल्या महिला आरोग्य केंद्रासाठी मिळण्यासाठी आरोग्य विभागाने मागणी केली होती. त्यासंदर्भात २२ आॅगस्ट २०१४ ला उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) यांनी गोसीखुर्द विभागाच्या पुनर्वसन अधिकाऱ्यांकडे सदर जागेची प्रत्यक्ष चौकशी करण्यास सांगितले. त्यावर पुनर्वसन अधिकाऱ्यांनी ही जागा रेड झोनमध्ये येत असल्यामुळे पूरबाधित जागा देता येत नसल्याचे कळविले होते. मात्र आता नगरपालिकेने हीच जागा खासगी व्यक्तीला १ लाख रुपयात ३० वर्षासाठी लीजवर दिली.
प्रस्तावित महिला व बालरुग्णालयासाठी संबंधित विभागाने नाकारलेली ५२ हजार ७३९ चौरस फूट जागा खासगी व्यक्तीला ३० वर्षांसाठी लीजवर देण्यात आली. त्यानंतर तत्काळ बांधकामाला सुरुवातही झाली आहे. यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप भ्रष्टाचारविरोधी सामाजिक न्याय मंचने केला आहे.
तेव्हा पूरबाधित जागेवर लीज तत्काळ रद्द करण्यात यावी, संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, १९६५ पासून ही जागा पूरबाधित आहे किंवा नाही याची तपासणी करण्यात यावी, बाजारासाठी शेतकरी संस्थेऐवजी खासगी व्यक्तीला कमी दरात का दिली याची चौकशी करण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारी धीरजकुमार यांच्यामार्फत पाठविण्यात आले. यातील दोषींविरोधात कारवाई करण्याच्या मागणीसाठी १४ मार्चपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा विष्णूदास लोणारे, नितेश मोगरे, लक्ष्मीकांत दांडेकर, राजकुमार दहेकर यांनी दिला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)