माजी अध्यक्षांना ठोठावला ३० हजारांचा दंड
By Admin | Updated: October 3, 2015 00:30 IST2015-10-03T00:30:31+5:302015-10-03T00:30:31+5:30
शाळा न्यायधिकरणाच्या आदेशाचे वेळेच्या आत पुर्तता न केल्याने तुमसरच्या फौजदारी न्यायालयाने एज्युकेशनल ...

माजी अध्यक्षांना ठोठावला ३० हजारांचा दंड
तुमसर न्यायालयाचा निकाल : शाळा न्यायधिकरणाच्या आदेशाची पुर्तता न करणे भोवले
तुमसर : शाळा न्यायधिकरणाच्या आदेशाचे वेळेच्या आत पुर्तता न केल्याने तुमसरच्या फौजदारी न्यायालयाने एज्युकेशनल सोसायटीचे तत्कालीन कार्यकारी अध्यक्ष मोरेश्वर निखाडे यांना ३० हजार दंडाची शिक्षा सुनावली आहे. तक्रारकर्ते सुभाष पडोळे यांना २५ हजार रुपये द्यावे व ५ हजार दंड स्वरुपात भरावे, असा आदेश न्यायालयाने गुरुवारी दिला.
तुमसर येथील एज्युकेशनल सोसायटीचे तत्कालीन अध्यक्ष मोरेश्वर निखाडे यांना तुमसर फौजदारी न्यायालयाने शाळा न्यायाधीकरण नागपूर यांचे अपीलनुसार २८ एप्रिल २०११ च्या आदेशाची वेळेच्या आत पुर्तता न केल्यामुळे महाराष्ट्र शिक्षण खाजगी संस्था कलम १३ (१) रेग्युलेशन अॅक्ट १९७७ अन्वये ३० हजाराचा दंड भरण्याची शिक्षा सुनावली आहे.
या प्रकरणात न्यायालयाने मोरेश्वर निखाडे यांचेकडून १२ हजार रुपये सालवंशी रुपात बॉन्डसह न्यायालयात भरुन घेण्यात आले. तक्रारकर्ते माजी प्राचार्य पडोळे यांनी निखाडे यांच्या नियमबाह्य कारवाईविषयी न्यायालयात दाद मागितली होती.
त्यानुसार शाळा न्यायाधिकरणाने सुभाष पडोळे यांच्या बाजूने निकाल देऊन संपूर्ण थकीत रक्कम व्यक्तीश: मोरेश्वर निखाडे यांनीच द्यावे, असे आदेशात म्हटले होते. या आदेशाची पुर्तता वेळेच्या आत न केल्यामुळे तक्रारकर्ते माजी प्राचार्य सुभाष पडोळे यांनी तुमसर येथील फौजदारी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार न्यायालयाने मोरेश्वर निखाडे यांना ही शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणात बँक वेजेस व व्याज असे मिळून १४ लाख रुपये मोरेश्वर निखाडे यांना माजी प्राचार्य सुभाष पडोळे यांना द्यावे लागणार आहे.
या निर्णयामुळे नियमबाह्य काम करणाऱ्या संस्था संचालकांचे धाबे दणाणले आहे. तक्रारकर्ता माजी प्राचार्य सुभाष पडोळे यांच्यावतीने अॅड. नरेश जिभकाटे यांनी तर मोरेश्वर निखाडे यांच्यावतीने अॅड. रावलानी यांनी युक्तीवाद केला. (तालुका प्रतिनिधी)