सर्पमित्रांनी उबविले ३० पानदिवड सापांचे पिल्ले
By Admin | Updated: July 26, 2014 01:28 IST2014-07-26T01:28:15+5:302014-07-26T01:28:15+5:30
येथील ग्रीनफ्रेन्ड्स नेचर क्लबचा सर्पमित्र पंकज भिवगडे याने

सर्पमित्रांनी उबविले ३० पानदिवड सापांचे पिल्ले
ग्रीनफ्रेण्डसचा पुढाकार : भंडारा - गोंदिया जिल्ह्यात प्रथमच कृत्रिमरीत्या साप अंडे उबविण्याचा प्रयोग
लाखनी : येथील ग्रीनफ्रेन्ड्स नेचर क्लबचा सर्पमित्र पंकज भिवगडे याने घरासमोरील असलेल्या नालीतून दोन महिन्यापूर्वी एका पाणदिवड सापाला (चेकर्ड किल बँक वॉटर स्नेक) पकडून बरणीमध्ये ठेवले होते. साप गर्भार असल्याचे लक्षात येताच सपंमित्रानी कृत्रिमरित्या पिल्ले उबविण्याचा निर्णय घेतला. या सापाने बरणीमध्येच प्रथम ३० अंडी नंतर १० असे ४० अंडी दिले.
तीन वर्षांपूर्वी असा प्रयोग अयशस्वी झाल्यामुळे या सर्पमित्रांनी काळजीपूर्वक अंडे उबविण्याचे ठरविले. याकरिता ग्रीनफ्रेन्ड्स नेचर क्लबचे संघटक प्रा.अशोक गायधने यांनी मार्गदर्शन केले.
सापाच्या अंडे उबविण्याचा कालावधी ५५ ते ६७ दिवसाचा असल्याने प्रखर उन्हात ते टिकणे शक्य नव्हते. त्यामुळे पंकज भिवगडे, गगन पाल व मयूर गायधने यांनी बरणीतील सापाला व अंड्यांना कोणताही धक्का लागणार नाही, अशारितीने बाहेर काढले. अंड्यांना बाहेर काढून बरणीमध्ये थंड माती - रेती ठेवली व पुन्हा अंड्यातील द्रव न हलविता ते थंड माती रेती मिश्रणावर ठेवले. बरणीतील वातावरण ३० अंश सेल्सीअसच्या वर जाणार नाही, याची काळजी घेतली. अखेर ६२ व्या दिवशी एकेक पाणदिवडचे पिल्लू बाहेर पडणे सुरु झाले व दोन दिवसात ३० अंड्यातून पिल्ले बाहेर पडून बरणीमध्ये हालचाल करायला लागले. तेव्हा सर्पमित्रांना परिश्रमाचे चीज झाल्याचे वाटले.
कृत्रिमरित्या पाणदिवड सापाचे अंडे उबविण्याचा भंडारा - गोंदिया जिल्ह्यातील हा पहिलाच यशस्वी प्रयोग आहे. सर्व पिल्लांना सोडण्यात आले.ही कामगिरी सर्पमित्र पंकज भिवगडे, गगन पाल, मयूर गायधने, आरिफ बेग, सचिन सार्वे व अश्पाक शेख यांनी केली. (तालुका प्रतिनिधी)