‘गोसेखुर्द’ चे २९ दरवाजे अर्धा मीटरने उघडले
By Admin | Updated: September 14, 2016 00:27 IST2016-09-14T00:27:58+5:302016-09-14T00:27:58+5:30
मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. या पावसामुळे वैनगंगा नदी भरून वाहत असून गोसेखुर्द धरणाचा जलस्तर वाढला आहे.

‘गोसेखुर्द’ चे २९ दरवाजे अर्धा मीटरने उघडले
धरणाचा जलस्तर २४१.५०० मीटरवर स्थिर : १ लाख ४,५३२ क्युसेस पाण्याचा विसर्ग
भंडारा : मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. या पावसामुळे वैनगंगा नदी भरून वाहत असून गोसेखुर्द धरणाचा जलस्तर वाढला आहे. धरणाचा जलस्तर २४१.५०० मीटरवर स्थिर ठेवण्यासाठी धरण विभागाने ३३ पैकी २९ दरवाजे अर्धा मीटरने सुरू केले आहे. या दरवाजामधून १ लाख ४,५३२ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या धरणामुळे गडचिरोली जिल्ह्यात पूर येण्याची शक्यता बळावली आहे.
वैनगंगा नदीच्या वरच्या भागात शनिवारपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे सीमावर्ती भागात नदी-नाले आणि धरणाचा जलस्तर वाढला आहे. संभावित पूरस्थिती नियंत्रित करण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील पुजारीटोला, कालीसराड आणि सिरपूर जलाशयाचे दरवाजे सुरू केल्यामुळे पाणी वैनगंगा नदीत सोडण्यात आले आहे.
कालीसराड धरणाचे दोन दरवाजे १.६० मीटर, पुजारीटोला धरणाचे १० दरवाजे १.२० मीटर तर सिरपूर धरणाचे ६ दरवाजे ०.३० मीटरने सुरू केले आहे. त्यामुळे वैनगंगा नदीचा जलस्तर वाढत असून गोसेखुर्द धरणाचा जलस्तर वाढत आहे.
गोसेखुर्द धरणाचा वाढता जलस्तर लक्षात घेता ३३ दरवाजांपैकी २९ दरवाजे सोमवारच्या रात्री ११ वाजता अर्धा मीटरने सुरू करण्यात आले. या दरवाजांमधून १ लाख ४.५३२ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मंगळवारला सकाळी कारधा नदी पुलावर वैनगंगा नदीचा जलस्तर ४.९७ मीटर नोंदविण्यात आला असून ९ मीटर या धोक्याच्या पातळीपासून ४ मीटरने खाली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
यावर्षी ७० टक्केच पावसाची नोंद
भंडारा जिल्ह्यात शनिवार रात्रीपासून पाऊस सुरू आहे. मागील २४ तासात २९.७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. १ जूनपासून १२ सप्टेंबरपर्यंत ११५०.७ मि.मी. सरासरी पावसाची गरज असताना त्यातुलनेत ८००.६ मि.मी. पाऊस पडला असून हा आतापर्यंत ७० टक्केच पाऊस पडला आहे. तीन दिवसांपासून पाऊस पडत असल्यामुळे पावसाची टक्केवारी वाढली आहे. हा पाऊस नसता तर यावर्षी ५५ टक्के पावसाची नोंद झाली असती.
पावसामुळे शेतकरी सुखावला
मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी सुखावला आहे. एका पाण्याअभावी हातचे पीक जाणार असल्यामुळे भीतीमुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसाने नवसंजिवनी दिली आहे. त्यामुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.