शेतकऱ्यांचे २.७३ कोेटी रुपयांचे चुकारे अडले
By Admin | Updated: December 6, 2014 00:59 IST2014-12-06T00:59:47+5:302014-12-06T00:59:47+5:30
जिल्हा धानाचा जिल्हा म्हणून ओळखला जात असला तरी यावर्षी उत्पादनात झालेल्या कमालीच्या घटमुळे मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी धान खरेदीत तफावत दिसून येत आहे.

शेतकऱ्यांचे २.७३ कोेटी रुपयांचे चुकारे अडले
देवानंद नंदेश्वर भंडारा
जिल्हा धानाचा जिल्हा म्हणून ओळखला जात असला तरी यावर्षी उत्पादनात झालेल्या कमालीच्या घटमुळे मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी धान खरेदीत तफावत दिसून येत आहे. यावर्षी दि.४ डिसेंबरपर्यंत एकूण ९१ हजार २९१ क्विंटल धान खरेदी करण्यात आली़ १२ कोटी ४१ लक्ष ७८ हजार ४२ रूपयांची धान खरेदी झाली असून शेतकऱ्यांचे २ कोटी ७३ लक्ष २६ हजार रुपयांचे चुकारे अडले आहे.
भंडारा जिल्ह्यात मागील खरीप हंगामामध्ये निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हतबल झाला होता़ निसर्गाच्या प्रकोपामुळे धान पिक उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. मिळेल त्या आशेने शेतकऱ्यांनी धानाचे चुरणे केले़ मात्र यावर्षी धान खरेदी केंद्र सुरू करण्यास उशीर झाल्यामुळे त्यांनी कवडीमोल भावात व्यापाऱ्यांना धान विकावे लागले.
विविध संघटनांच्या आक्रमक भूमिकांमुळे धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. राज्य शासनाने धानाला योग्य भाव मिळावा, यासाठी राज्यात आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले़ जिल्ह्यात ५२ धान खरेदी केंद्र उघडण्याचे निश्चित झाले असले तरी आजपर्यंत ४६ केंद्र सुरू झाले आहे. प्रत्यक्षात मात्र ४३ केंद्रांवर धान खरेदी सुरू झालेली आहेत. उच्च प्रतिच्या धानाला प्रती क्विंटल १,४०० रूपये तर साधारण प्रतिच्या धानाला १,३६० रुपये आधारभूत किंमत देण्यात येत आहे.
यावर्षीच्या खरीप हंगामानंतर आतापर्यंत जिल्ह्यात ४६ धान खरेदी केंद्र सुरू आहे. या दरम्यान ५५७.०५ क्विंटल उच्च दर्जाचे धान खरेदी करण्यात आली. हे धान तुमसर तालुक्यातील हरदोली व तुमसर या दोन सहकारी खरेदी विक्री केंद्रातून खरेदी करण्यात आली.
जिल्ह्यात ९० हजार ७३३.९५ क्विंटल साधारण धानाची खरेदी करण्यात आली. यात भंडारा तालुक्यात एक हजार ८३१.६०, मोहाडी तालुक्यात सात हजार ५५७.९५, तुमसर तालुक्यात २१ हजार ५९२, लाखनी तालुक्यात २१ हजार ४७३.०५, साकोली तालुक्यात १५ हजार ८७३.१०, लाखांदूर तालुक्यात १४ हजार ४८५.६५ तर पवनी तालुक्यात सात हजार ६२०.६० क्विंटलचा समावेश आहे.