२७१ उमेदवारांचे भाग्य मशीनबंद
By Admin | Updated: November 2, 2015 00:43 IST2015-11-02T00:43:29+5:302015-11-02T00:43:29+5:30
जिल्ह्यातील मोहाडी, लाखनी व लाखांदूर या तीन नगरपंचायत निवडणुकीसाठी रविवारला प्रत्येकी १७ मतदान केंद्रावर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

२७१ उमेदवारांचे भाग्य मशीनबंद
नगरपंचायत निवडणूक : जिल्ह्यात ८५ टक्के मतदान, मतदारांमध्ये कमालीचा उत्साह, शांततेत पार पडले मतदान
भंडारा : जिल्ह्यातील मोहाडी, लाखनी व लाखांदूर या तीन नगरपंचायत निवडणुकीसाठी रविवारला प्रत्येकी १७ मतदान केंद्रावर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यात सरासरी ८५ टक्के मतदान झाले असून २७१ उमेदवारांचे भाग्य मशिनबंद झाले आहे.
१७ सदस्यीय नगरपंचायत निवडणुकीसाठी मोहाडीत ९९, लाखनीत ७३ आणि लाखांदुरात ९९ असे २७१ उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीमध्ये १२ हजार ६८३ पुरुष मतदार तर १२ हजार ५७९ महिला मतदार असे एकूण २५ हजार २६२ मतदार आहेत. नगराचे राजकारण ढवळून काढणाऱ्या या निवडणुकीत मतदारांमध्ये कमालीचा उत्साह दिसून आला. तरुणांसह वयोवृद्ध मतदारही मतदानात आघाडीवर होते. दिवसभरात टप्प्याटप्प्याने मतदानाच्या टक्केवारी सायंकाळपर्यंत वाढत गेली.
१७ प्रभागासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर प्रत्येकी चार अधिकाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले होते. त्यात एक केंद्राध्यक्ष आणि तीन मतदान अधिकारी नियुक्त करण्यात आले होते. याशिवाय पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सर्वच १७ वॉर्डात प्रमुख राजकीय पक्षाचे उमेदवार रिंगणात होते.
मोहाडीत ८२.४३ टक्के मतदान
मोहाडी : नगर पंचायतच्या निवडणुकीत आज ६,५५० मतदारांनी ९९ उमेदवारांचे भाग्य ईव्हीएममध्ये बंद केले. सकाळपासून १७ वॉर्डात शांतपणे मतदान पार पडले. मतदानाच्या आदल्या रात्री उमेदवार व नेत्यांनी मतदारांना आमिषे दाखवून मत वळविण्याचा प्रयत्न केला. आमदार चरण वाघमारे यांनी निवडणूक प्रतिष्ठेची बनविली होती. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे मोहाडीत तळ ठोकून होते. माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, जिल्हा परिषद सभापती नरेश डहारे, राजू कारेमोरे होते. काँग्रेसकडून आशिष पात्रे यांनी किल्ला लढविला. सगळ्याच पक्षांनी उमेदवार निवडून येण्यासाठी मेहनत घेतली. या निवडणुकीत ३,१४५ महिलांनी तर ३,४०५ पुरुषांनी मतदानाचा हक्क बजावला. मोहाडी पंचायत समितीचे माजी उपसभापती खुशाल कोसरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील गिरीपुंजे, राष्ट्रवादीच्या मनीषा गायधने यांच्या प्रतिष्ठेच्या जागा होत्या. या तीन जागांकडे मोहाडी नगरवासीयांचे लक्ष होते. सकाळी १० वाजतापासून मतमोजणी तहसील कार्यालयात होणार आहे. मतमोजणीच्या पाच फेऱ्या होतील. दुपारी १२.३० पर्यंत नगरपंचायतच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. भाजपनेही निवडणूक प्रतिष्ठेची बनविली होती. काँग्रेसनेही नगरपंचायतवर झेंडा फडकविण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती.
लाखनीत ७८.२५ टक्के मतदान
लाखनी : नगरपंचायत निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडले. सकाळी ८ वाजतापासून मतदानास १७ मतदान केंद्रावर प्रारंभ झाला. सकाळी ९.३० वाजतापर्यंत १४.२९ टक्के मतदान झाले. सकाळी ११.३० वाजता मतदानाचा वेग वाढला. २९.७३ टक्के मतदान झाले तर दुपारी १.३० वाजता ४९.१४ टक्के मतदान झाले. एकूण ५,०५८ मतदारांचे मतदान झाले होते. यात २,२५९ पुरुष तर २,७९९ महिलांनी मतदान केले. दुपारी ३.३० पर्यंत ६६.७९ टक्के मतदान पार झाले होते.
उमेदवारांचे प्रतिनिधी मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहन देताना दिसून येत होते. उमेदवार व मतदारांचे लक्ष मतमोजणीकडे लागले आहे. १७ प्रभागात ७३ उमेदवार रिंगणात आहे. काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस यांची सरशी होणार की कोणत्या प्रभागात अपक्ष उमेदवार बाजी मारणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. प्रत्येक गल्लीबोळात निवडणुकीचे वातावरण होते. उमेदवारांच्या नजरा मतदाराकडे होते.
लाखांदुरात ८१.०५ टक्के मतदान
लाखांदूर : येथील नगरपंचायत निवडणुकीत १७ प्रभागासाठी ९९ उमेदवार रिंगणात होते. त्यांचे भाग्य मशिन बंद झाले असून एकुण मतदान ७,०८९ मतदारांपैकी ५७४६ झाले असून ८१.८६ टक्के मतदारानी मतदानाचा हक्क बजावला आहे. निवडणुकीमध्ये कुठलाही पक्षाला बहुमत मिळल्याची शक्यता दिसत नसून निकालाकडे मतदारांचे लक्ष लागलेले आहे. लाखांदूर नगरपंचायत निवडणुकीत १७ प्रभागासाठी ९९ उमेदवारांमध्ये १७ काँग्रेस, १७ भाजपा, १७ राष्ट्रवादी, १० शिवसेना व ३८ अपक्ष उमेदवार रिंगणात होते. यामध्ये वॉर्ड क्र. १ मध्ये ६९.७४ टक्के, वॉर्ड क्र. २ मध्ये ७५.४२ टक्के, वॉर्ड क्र. ३ मध्ये ८१.३५ टक्के, वॉर्ड क्र. ४ मध्ये ७८.९४ टक्के, वॉर्ड क्र. ५ मध्ये ७९.२१ टक्के, वॉर्ड क्र. ६ मध्ये ७६.९४ टक्के, वॉर्ड क्र. ७ मध्ये ७४.२५ टक्के, वॉर्ड क्र. ८ मध्ये ७६.८२ टक्के, वॉर्ड क्र. ९ मध्ये ८५.५० टक्के, वॉर्ड क्र. १० मध्ये ७३.१२ टक्के, वॉर्ड क्र. ११ मध्ये ८४.५५ टक्के, वॉर्ड क्र. १२ मध्ये ८९.५३ टक्के, वॉर्ड क्र. १३ मध्ये ८६.५२ टक्के, वॉर्ड क्र. १४ मध्ये ८३.३० टक्के, वॉर्ड क्र. १५ मध्ये ८३.६६ टक्के, वॉर्ड क्र. १६ मध्ये ८७.१७ टक्के, वॉर्ड क्र. १७ मध्ये ९१.६७ टक्के मतदारांनी मतदान केले. एकूण ७,०८९ मतदारांपैकी २,८९० पुरुष तर २,८५६ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. पहिल्या नगरपंचायतवर कुणाची सत्ता स्थापन होणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. उद्या सकाळी कुठल्या उमेदवारांची दिवाळी चांगली होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)
मतदानात उत्साह, पण रांगा नाही
स्थानिक निवडणुका असल्यामुळे या निवडणुकीत मतदारांचा प्रचंड उत्साह दिसून आला. मतदारांची संख्या कमी असल्यामुळे कुठेही रांगा लागल्याचे चित्र नव्हते. सकाळी कमी आणि नंतर टप्प्याटप्प्याने मतदानाचा वेग वाढत गेला. सकाळपासून सर्वच प्रभागाच्या मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसून आल्या नाहीत. प्रभागातील मतदार संख्या कमी असल्याने संथपणे व शांतपणे सायंकाळपर्यंत मतदान पार पडले. सकाळी ९.३० वाजतापर्यंत १५ टक्के मतदान झाले. सकाळी ११.३० वाजतापर्यंत ३० टक्के, दुपारी १.३० वाजता ५० टक्के मतदान झाले. दुपारी ३.३० वाजतापर्यंत ६५ टक्के तर ५.३० पर्यंत ८० टक्के मतदान झाले होते.
लाखनीत वार्तांकनांसाठी मज्जाव
लाखनी नगरपंचायत निवडणुकीचे वार्तांकन करण्यासाठी पत्रकारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना परवानगी मागितली असता ओळखपत्र देताना मतदान केंद्र व मतमोजणी केंद्रात पत्रकारांना प्रवेशासाठी मज्जाव केला. पत्रकार मतदान केंद्रात जाणार नाही व माहिती गोळा करणार नाही, असे सांगून पत्रकारांना वार्तांकन करु देण्यात आले नाही.