रेतीचे २७ ट्रक पकडले
By Admin | Updated: December 13, 2015 00:29 IST2015-12-13T00:29:08+5:302015-12-13T00:29:08+5:30
लिलावात खरेदी केलेल्या रेती साठा ऐवजी लिलावधारकाकडून राजरोसपणे नदीतून रेतीचा उपसा केला जात असल्याची ...

रेतीचे २७ ट्रक पकडले
आष्टीवासीयांचा पुढाकार : रेती साठा उचलण्याऐवजी नदीतून करीत होते उपसा
तुमसर : लिलावात खरेदी केलेल्या रेती साठा ऐवजी लिलावधारकाकडून राजरोसपणे नदीतून रेतीचा उपसा केला जात असल्याची तक्रार अनेकदा करुनही महसूल विभागाने कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे आज, शनिवारी सकाळी १.३० वाजताच्या सुमारास आष्टी येथील जवळपास ४५० गावकऱ्यांनी रेती घाटावर जावून अवैध रेतीचे तब्बल २७ ट्रक पकडले. या प्रकाराची माहिती उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांना देण्यात आली. अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून कारवाई केली.नदीघाटातून रेतीचे उत्खनन करुन जेसीबीद्वारे ट्रकमध्ये रेतीची वाहतूक करीत असताना ही कारवाई करण्यात आली.
मागील महिन्यात आष्टी रेतीघाटाजवळ साठा असलेल्या ७०० ब्रास रेतीचा लिलाव करण्यात आला. १,५०० रुपये ब्रासप्रमाणे १० लाख ५० हजार रुपयांची रेती केवळ १४ रुपये अधिक बोली लावून लिलावधारकाने अधिकाऱ्यांच्या संगणमताने खरेदी केली. त्यानुसार लिलावधारकाला ७०० ब्रासच्या टीपी महसूल विभागाला मिळताच लिलावधारकाने मिळत्याजुळत्या नंबरचे ट्रक घाटावर बोलावून साठा केलेल्या रेतीचा उपसा न करता थेट बावनथडी नदीपात्रातून उपसा करीत होते. त्यामुळे किनाऱ्यालगत असलेल्या शेतीला धोका निर्माण झाला. पाण्याची पातळी खालावली आहे. संतप्त शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वी लिलाव धारकाला घाटावर जावून समज देण्यात आली. केवळ साठा केलेल्या रेतीचा उपसा करावा, असे बजावण्यात आले होते. मात्र लिलावधारकाने याकडे दुर्लक्ष केले. त्याने राजरोसपणे नदीघाटातून उत्खनन सुरुच ठेवले होते. यासंबंधी महसूल विभागाला तक्रार देण्यात आली. मात्र त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे अखेर आज, शनिवारी आष्टी वासीयांनी रेतीघाट गाठले. २१ ट्रक पकडण्यात आले. यानंतर याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी व तहसिलदारांना देण्यात आली. अधिकारी घटनास्थळी दाखल होताच ट्रक पालिसांच्या स्वाधीन करण्यात आले. लिलावधारकाने लिलावात घेतलेली रेती दोन दिवसात उचल करुन साठा असलेली रेती संपल्याचे पत्र तहसिलदारांनी ग्रामस्थांना लिहून द्यावे, ही मागणी रेटून धरली. रेतीघाटावर काही काळ तणाव निर्माण झाला होता. नायब तहसीलदार हरिश्ंचद्र मडावी यांनी मध्यस्थी करुन तोडगा काढला. कारवाईचे नेतृत्व पंचायत समिती सदस्य शिशुपाल गौपाले, बालचंद्र नागपूरे, मारोती नागपूरे, चेतन गौपाले, अनिल गौपाले यांनी केले. (शहर प्रतिनिधी)