लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तालुक्यातील डोंगरला येथील वनविभागाच्या रोपवाटिकेत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत लावण्यात आलेल्या तब्बल २६ हजार २८१ रोपांचे वन्य प्राण्यांनी नुकसान केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या रोपांसाठी ७ लाख ३० हजारांचा निधी खर्च करण्यात आल्याचे डोंगरला येथील रोपवाटिकेतील फलकावर नमूद केले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात वन्यप्राणी रोपांचे नुकसान कसे करू शकतात, याबाबत हे प्रकरण वनमंत्र्यांच्या दालनात गेले आहे.
तक्रारीनंतर झालेल्या प्राथमिक चौकशीत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत रोपे लावल्याचा दावा असला, तरी प्रत्यक्ष चौकशी अहवालात मग्रारोहयो किंवा अभिसरण योजनेची नोंद असल्याचे समोर आले आहे. या नोंदीतील विसंगतीमुळेच प्रकरण अधिक संशयास्पद ठरले आहे.
वन्यप्राण्यांचा बहाणा ?सुत्रांच्या मते, ५० हजार रोपांपैकी वन्यप्राण्यांनी २६ हजार २८१ रोपे नष्ट केली, हा दावा संशयास्पद आहे. देखभालअभावी रोपे नष्ट झाली.
२६ हजार पिशव्या कुठे गेल्याडोंगरला रोपवाटिकेत एकूण ५० हजार रोपे तयार करण्यात आली होती. त्यापैकी २६ हजार रोपे वन्य प्राण्यांनी नष्ट केली, असे अहवालात नमूद आहे. रोपे वन्यप्राण्यांनी नष्ट केली. परंतु, ज्या प्लास्टिक पिशवीत ही रोपे लावण्यात आली होती. त्या पिशव्या कुठे गेल्या, असा प्रश्न येथे उपस्थित होतो.
अधिकाऱ्यांनी बयान नोंदवलीयाप्रकरणी वनपरिक्षेत्राधिकारी, वनरक्षक तसेच अधिसंख्य वन मजुराचे बयान घेण्यात आली आहेत. सहायक वनसंरक्षक प्रवीण नाईक, विभागीय वन अधिकारी लक्ष्मण आवारे आणि तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी नितेश धनविजय यांच्या चौकशीची मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
"असुरक्षित असलेल्या रोपवाटिकेत एवढा मोठा निधी कसा खर्च करण्यात आला, असे प्रश्न येथे उपस्थित होतात. डोंगरला रोपवाटिकेतील वन्यप्राण्यांनी रोपे नष्ट केली. याप्रकरणी त्रयस्थ समितीने चौकशी करावी, अशी विनंती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली जाईल."- लक्ष्मण आवारे, विभागीय वनाधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग, भंडारा