तीन वर्षांत २.६० लाख वृक्ष लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2016 00:25 IST2016-06-05T00:25:53+5:302016-06-05T00:25:53+5:30

शासनाच्या विविध योजना अंतर्गत भंडारा जिल्ह्यात सामाजिक वनीकरण विभागातर्फे सन २०१३ ते २०१५ च्या पावसाळ्यात २ लाख ५९ हजार ८८२ वृक्षांची लागवड करण्यात आली.

2.60 lakhs plantation in three years | तीन वर्षांत २.६० लाख वृक्ष लागवड

तीन वर्षांत २.६० लाख वृक्ष लागवड

सामाजिक वनीकरण विभागाचा उपक्रम : सप्ताहात होणार ७.६० लाखांची वृक्ष लागवड
देवानंद नंदेश्वर भंडारा
शासनाच्या विविध योजना अंतर्गत भंडारा जिल्ह्यात सामाजिक वनीकरण विभागातर्फे सन २०१३ ते २०१५ च्या पावसाळ्यात २ लाख ५९ हजार ८८२ वृक्षांची लागवड करण्यात आली.
भंडारा जिल्ह्यात सामाजिक वनीकरण विभागांतर्गत भंडारा, मोहाडी, तुमसर, पवनी व साकोली असे पाच सामाजिक वनीकरण परिक्षेत्राचा समावेश आहे. राज्यात सन १९८२ मध्ये शासनाने स्वतंत्र सामाजिक वनीकरण विभागाची निर्मिती केली. वाढती लोकसंख्या व वाढते औद्योगिकरण यामुळे वनांविषयी असलेल्या दैनंदिन गरजामुळे उपलब्ध असलेल्या वनांवर पडत असलेला ताण कमी व्हावा, ग्रामीण भागात रोजगारांच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, तसेच दिवसेंदिवस ढासळत असलेल्या पर्यावरणाच्या संरक्षणामध्ये वृक्षांचे असलेले अनन्यसाधारण महत्व विचारात घेऊन सर्वसामान्य जनता व विद्यार्थ्यांमध्ये वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनाची आवड निर्माण व्हावी, या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसिद्धी करणे तसेच पाणवहाळ, रोहयो, मग्रारोहयो, कालवे आदी विविध योजनेंतर्गत सामूहिक, खासगी पडीत जमिनीवर वृक्ष लागवड, रस्ते दुतर्फा वृक्ष लागवड, शाळेच्या परिसरात तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयाच्या परिसरात वृक्ष लागवड करण्याचे कार्य वनीकरण विभागाकडे आहे.
सन २००३ मध्ये ५० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट्ये होते. त्यापैकी विविध योजनेंतर्गत ७५ हजार ८४१ वृक्ष लावण्यात आले. सन २०१४ च्या पावसाळ्यात मग्रारोहयोंतर्गत विविध योजनेखाली ४७ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट्ये देण्यात आले होते.
यापैकी सामाजिक वनीकरण विभागाने ४५ हजार २५० वृक्ष लागवड केली. तर मागील वर्षी सन २०१५ च्या पावसाळ्यात १७ हजार ७०० वृक्ष लागवड करण्यात आली.

पर्यावरण रक्षणासाठी लोकचळवळ आवश्यक
पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवताली जे जे काही दिसते ते पर्यावरण. यात सजीव-निर्जीव यांचा समावेश आहे, परंतु आज पर्यावरणाबाबत अनेक प्रश्न गंभीर स्वरूपात उभे आहेत. नद्यांच्या काठावरील उद्योगांकडून प्रक्रिया न झालेले दूषित सांडपाणी नद्यांमध्ये सोडले जाते. त्यामुळे जलप्रदूषण होते. आपल्याकडे वृक्षारोपण करून पर्यावरण दिन साजरा केला जातो, पण ती एक औपचारिकता दिसते. कारण कधी शेकडो, तर कधी हजारो रोपटी लावली जातात, पण पुढे काय होते ते कळत नाही. त्यातच वाढती लोकसंख्या, बदलती जीवनशैली, जल, वायू, प्लॅस्टिक पिशव्या आदी कारणांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. पर्यावरण संरक्षण ही केवळ सरकाची जबाबदारी नाही. पर्यावरण जपणे ही जनतेचीही तेवढीच जबाबदारी आहे. तेव्हा सरकार काय करेल, अशी आशा न बाळगता सर्वसामान्यांनी पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेणे ही काळाची गरज आहे आणि पर्यावरण रक्षणाला लोकचळवळीचे स्वरूप देणे हीसुद्धा काळाची गरज आहे. त्यासाठी सर्वांनी नद्यांचे संरक्षण, वन्य जीवांचे संरक्षण, प्लास्टिकऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करू. ती पर्यावरण रक्षणाची आणि प्रदूषणाची नांदी ठरेल.
पर्यावरण सप्ताह ७.६० लाख वृक्षांची लागवड
ग्रामविकास विभागातर्फे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ ९ जूनपर्यंत राज्यात पर्यावरण सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहात जिल्ह्यात ७.६० लाख वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. तसेच पर्यावरण रक्षणाचा संदेश पोहचविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या अंतर्गत ७ लाख ५९ हजार ७०० वृक्षांची लागवड केली जाणार आहे. यात वनविभागांतर्गत ६ लाख २३ हजार ७०० सामाजिक वनीकरण विभागांतर्गत १५ हजार वनविकास महामंडळांतर्गत १७०० व इतर शासकीय विभागांतर्गत १ लाख १९ हजार ३०० वृक्षांची लागवड करण्यात येईल. यासाठी ६ लाख ३१ हजार ७२५ खड्डे खोदण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्यातील वनविभागाच्या नर्सरीत ११ लाख १५ हजार ५८७, सामाजिक वनीकरण विभागात १ लाख २८ हजार, कृषी विभाग १० हजार व खासगी व्यक्तींकडे ३२ हजार रुपये उपलब्ध आहेत.

Web Title: 2.60 lakhs plantation in three years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.