वीज वितरण विभागाचे सर्वेक्षण पूर्र्ण : १२ नवीन विद्युत रोहित्र लावण्याचा प्रस्ताव लोकमत न्यूज नेटवर्क मोहाडी : तालुक्यातील वीज वितरणाच्या सोयी सुधारण्यासाठी व २५ वर्षापर्यंत वीज समस्या दूर करण्यासाठी उपविभाग मोहाडीतर्फे नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी सर्वेक्षण सुद्धा पूर्ण करण्यात आले आहे. मोहाडी शहरात विजेची मोठी समस्या आहे. वारंवार वीज पुरवठा खंडित होणे, भार कमी असणे ही नित्याचीच बाब आहे. मोहाडी शहरात अनेक वर्षापासुनचे असलेले विद्युत रोहित्र लोकसंख्या वाढल्यामुळे अपयशी ठरलेले आहेत. ग्राहकांची संख्या वाढल्यामुळे नवीन रोहित्र बसविणे आवश्यक झालेले आहे. यासाठी येथील उपकार्यकारी अभियंता मंगेश कहाळे यांनी पुढील २५ वर्षात विज समस्या उदभवणार नाही, असे नियोजन तयार केले आहे. यासाठी मोहाडी शहरात ११ केव्ही वीज लघुदाब वाहीनीचे सर्व्हे करण्यात येत आहे. यासाठी वीज ग्राहकातर्फे सुचना व उत्स्फूर्त प्रतिसाद सुद्धा मिळत आहे. शहरात अंदाजे १२ नवीन विद्युत ट्रान्सफार्मर लावण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे. यात वरिष्ठ पातळीवरून या प्रस्तावाला अंतिम मान्यता मिळाली तर मोहाडीवासीयांची वीज समस्या कायमची संपणार आहे. कृषी पंपधारक शेतकऱ्यांनी विज बिल दुरूस्तीसाठी तसेच आधार कार्ड व मोबाईल क्रमांकाच्या नोंदणीसाठी आधारकार्ड व मोबाईल क्रमांकासह नजीकच्या वीज वितरण कार्यालयास संपर्क करावा तसेच विज ग्राहकांना कोणत्याही प्रकारचे विजेची समस्या असल्यास तसेच वीज वितरणाच्या पायाभूत सोयीबाबत सुचना असल्यास उपविभागीय कार्यालय किंवा वरठीचे शाखा अभियंता हरीष डायरे, मोहाडी शाखा अभियंता मस्के, आंधळगाव शाखा अभियंता मारसिंगे, जांब शाखा अभियंता मेंढे, करडी शाखा अभियंत लाडे कार्यरत आहेत. विजेची चोरी करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकातून कळविण्यात आले आहे.
वीज विभागाचे २५ वर्षांचे नियोजन
By admin | Updated: May 12, 2017 01:57 IST